
दैनिक स्थैर्य । 6 मार्च 2025। फलटण । एसटी महामंडळाकडे प्रलंबित असलेल्या विविध स्वरूपाच्या थकबाकी एसटी कर्मचार्यांनी वारंवार मागणी करूनही ती मिळत नसल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे बुधवारी (दि. 5) रोजी येथील एसटी आगाराच्या मुख्य गेटसमोर कामगार संघटनेच्यावतीने महामंडळाच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.
एसटी कामगारांना एप्रिल 2020 ते 31 मार्च 2024 अखेरची थकबाकी देण्यात यावी. 2018 च्या महागाई भत्याची थकबाकी कामगारांना देण्याबाबत न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी. 2016 ते 2020 या कालावधीत वेतनवाढ व घरभाडे वाढीचा दर 24 टक्के करून त्याची थकबाकी देण्यात यावी.
2016 ते 2020 च्या कालावधीतील कामगारांच्या वार्षिक वेतनवाढीचा दर तीन टक्के करून राहिलेली थकबाकी देण्यात यावी. शासकीय कर्मचार्यांप्रमाणे एसटी कर्मचार्यांना 53 टक्के महागाई भत्ता थकबाकीसह देण्यात यावा. भविष्य निर्वाह निधीच्या खात्यातून कामगारांना मागणीनुसार उचल देण्यात यावी. नवीन शिस्त व आवेदन पद्धत लागू करावी, अशा स्वरूपाच्या मागण्या संघटनेच्यावतीने करण्यात आल्या.
यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष पोपट सोनावले, सचिव योगेश भागवत संघटक सचिव गणेश सावंत, खजिनदार निरप्पा वाघमोडे,विभागीय सदस्य सुरेश अडगळे, बाळासाहेब जगताप, सुजित जगताप, संघटनेतील जेष्ठ नेते सुरेश पन्हाळे, दत्तात्रय कोळेकर, दिपक बेलदार ,विलास डांगे, प्रवीण बोबडे, गणेश ननवरे , महेश अनिल भोसले, सागर चांगण, निलेश बोधे, नितीन शिंदे आदी संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.