स्थैय, मुंबई दि ५: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्यभरात लॉकडाऊन लावण्यात आला होता. या काळात एसटी महामंडळाची सेवा देखील बंद होती. यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला आहे. एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले असून त्याचा फटका त्यांच्या कुटुंबियांना बसला आहे. वेतन नसल्यामुळे, शाळेची फी थकली असून घरखर्चाला देखील पैसे नाहीत. 15 ऑक्टोबरपर्यंत तीन महिन्यांचा पगार न मिळाल्यास कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपोषणाला बसणार आहेत.
याबाबत बोलताना एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले की, कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. अनेकांच्या डोक्यावर कर्जाचे ओझे वाढले आहे. आमचा संयम सुटत चालला आहे. सरकारने एसटी महामंडळाला वेतनासाठी पैसे द्यावेत. याबाबत एसटी कर्मचारी काँग्रेसच्या कार्यकारिणीत मान्यता घेऊन आंदोलन करण्यात येईल. यामध्ये कर्मचाऱ्यांसह कुटुंबीय असणार आहेत. त्यामुळे एसटी वाहतुकीवर याचा परिणाम होईल.