स्थैर्य, मुंबई, दि.१९: एसटीचा कर्मचारी सध्या दुहेरी संकटात सापडला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांचे वेतन अद्यापही मिळालेले नाही. त्यामुळे आर्थिक समस्या भेडसावत असतानाच दुसरीकडे एसटीत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या उपचारासाठी कर्मचा-यांना पैशाची गरजही भासत आहे. आतापर्यंत कोरोनामुळे ७२ कर्मचा-यांचा मृत्यू झाला असून गेल्या पाच दिवसांत पाच कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे.
जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे वेतन एसटीच्या एक लाखाहून अधिक अधिकारी व कर्मचा-यांना मिळाले नव्हते. जुलै महिन्याच्या वेतनासाठी राज्य शासनाकडून निधी मिळाल्यानंतर कर्मचा-यांना ७ ऑक्टोबरला वेतन देण्यात आले. पुढच्या वेतनासाठी राज्य शासनासोबत चर्चा करून लवकरच वेतन देण्याचे आश्वासन परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी आश्वासन दिले. परंतु कोरोनाची लागण झाल्याने गेल्या आठवड्यातील सोमवारी परब रुग्णालयात दाखल झाले आणि शनिवारी ते घरी परतले. सध्या ते विलगीकरणात आहेत. तर एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने बिहारला निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून गेले आहेत. त्यामुळे दोघेही उपलब्ध नसल्याने आर्थिक चिंता लागून राहिलेल्या कर्मचा-यांना वेतन दिवाळीआधी होणार की नाही, असा प्रश्न पडला आहे. एसटीची सेवा सुरळीत झाल्याने चालक, वाहकांसह सर्वच कर्मचारी कर्तव्यावर आहेत. आतापर्यंत २ हजार ११० कर्मचारी कोरोनाबाधित झाले.