दैनिक स्थैर्य । दि. २९ ऑक्टोबर २०२१ । फलटण । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) कामगारांनी एकजुटीने राज्यभर सुरु केलेल्या उपोषण व एस. टी. सेवा बंद आंदोलनाची दखल घेऊन राज्य शासन व महामंडळाने कामगारांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने कामगारांनी आंदोलन मागे घेऊन एस. टी. बस सेवा पूर्ववत सुरु केली आहे. फलटण आगारातील सर्व अधिकारी/कर्मचारी एकजुटीने या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य झाल्याचे वृत्त येताच फलटण येथे जल्लोष झाला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महामंडळाचा कारभार ठप्प झाल्याने सर्वांचीच मोठी आर्थिक कोंडी झाली होती, शासनाने निर्बंध मागे घेऊन टप्प्या टप्प्याने सर्व व्यवहार सुरळीत सुरु करण्यास सुरुवात करताना एस. टी. महामंडळाला काही अटी निकष लावून प्रवासी वाहतुकीस मुभा दिल्यानंतर फलटण आगाराने मोठ्या निर्धाराने एस. टी. बसेस सुरु करुन सर्व नियम, निकष सांभाळून प्रवाशांना सर्व सेवा सुविधा पूर्ववत उपलब्ध करुन दिल्याने सातारा विभागात दर्जेदार सेवा आणि सर्वाधिक उत्पन्न मिळविणारे आगार म्हणून नावलौकित मिळवीत फलटण आगारातील अधिकारी/कर्मचाऱ्यांनी आपले अग्रेसरत्व सिद्ध केले होते.
त्या पार्श्वभूमीवर राज्य स्तरीय कामगार संघटनेने आंदोलनाची हाक देताच फलटण आगारातील सर्व अधिकारी/कर्मचारी एकजुटीने आंदोलनात सहभागी झाले आणि आंदोलन यशस्वी करुन सर्व मागण्या मान्य होताच आज (शुक्रवार) पासून सर्व मार्गावरील एस. टी. बसेस पूर्ववत सुरु करण्यातही फलटण आगार आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण आंदोलनाला बुधवार दि. २७ ऑक्टोबरपासून सुरुवात केल्यानंतर फलटण आगारातील सर्व कामगारांनी गुरुवारपासून कामकाज बंद ठेवून बेमुदत उपोषण आंदोलनाला घोषणा देत पाठींबा दिला होता. त्यावेळी कामगार संघटना सचिव दादासाहेब बाबासाहेब माने, सदस्य सुरेश अडागळे, कामगार सेना माजी अध्यक्ष रामभाऊ भोसले, इंटक संघटना अध्यक्ष दत्तात्रय कोळेकर यांच्यासह सर्व अधिकारी/कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले हे फलटण आगाराचे वैशिष्ठ्य होते, आंदोलनात सहभागी होऊन यश मिळताच सर्वजण पुन्हा नव्या जोमाने प्रवाशांना सेवा देण्यासाठीही एकजुटीने कार्यरत झाले आहेत.
शासकीय कर्मचार्यांना दिला जाणारा २८ टक्के महागाई भत्ता राज्य परिवहन महामंडळ कामगारानाही लागू करावा, वार्षिक वेतन वाढीचा दर ३ टक्के करावा, शासन नियमाप्रमाणे घरभाडे भत्ता देण्यात यावा, वेतन प्रधान कायदा १९३६ नुसार राज्य परिवहन महामंडळ कामगारांना दि. ७ ते १० तारखेपर्यंत केलेल्या कामाचे वेतन देणे न्यायालयाने सूचीत करुनही दरमहा ७ तारखेला वेतन दिले जात नाही तरी दि. ७ तारखेला राज्य परिवहन कामगारांना वेतन देण्यात यावे, आंदोलनाच्या कालावधीत कर्मचारी, पदाधिकारी यांच्यावर केलेली कारवाई व दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, सन २०१९ पासून कोरोना कालावधीतील व इतर वैद्यकीय बिलाची रक्कम कामगारांना देण्यात यावी, सर्व चालक वाहकांना नियमीत कामगिरी देण्यात यावी, राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचे शासनात विलिकरण करण्यात यावे आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या होत्या त्यापैकी महागाई भत्ता, घरभाडे भत्ता वाढवून देण्याचा निर्णय झाला असून उर्वरित मागण्या तत्वत: मान्य करण्यात आल्या असून त्याबाबत लवकरच निर्णय होईल अशी अपेक्षा आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस. टी.) राज्यातील कर्मचार्यांच्या मान्य केलेल्या आर्थिक प्रश्नाची सोडवणूक राज्य परिवहन प्रशासनाकडून होत नसल्याने राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना सतत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून फलटण आगारातील कामगारांच्या विविध प्रश्नांवर लेखी व तोंडी चर्चा करुनही कामगारांचे प्रश्न प्रलंबीत असल्याने संघटना संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी व कर्मचारी बुधवार दि. २७ ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण आंदोलन करणार असल्याचे निवेदन यापूर्वी देण्यात आले होते, त्यानुसार गुरुवार पासून बेमुदत उपोषण आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र राज्यस्तरावर निर्णय होताच फलटण आगारातही कामगारांनी आंदोलन मागे घेऊन पूर्ववत कामकाज सुरु केले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस. टी.) फलटण आगारातील सर्व ५५० कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण आंदोलनात सहभाग घेतल्याने फलटण आगारातील एस. टी. बस सेवा ठप्प झाली होती. फलटण आगारातील एकूण १४० एस. टी. बस फेर्या बंद राहिल्या होत्या मात्र निर्णय होताच आजपासून (शुक्रवार) हे सर्व अधिकारी/कर्मचारी कामावर हजर झाले असून फलटण आगाराच्या सर्व बस फेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत.