दैनिक स्थैर्य | दि. १० नोव्हेंबर २०२१ | पुणे | खरं तर खूप टाळत होतो पण आज महाराष्ट्रात माझ्या एस.टी. कर्मचारी बंधूंचे जे हाल चालू आहेत ते बघून माझं मन राहवेना. कित्येक वर्षांपासूनच्या कर्मचारी त्यांच्या मागण्या मांडत आहेत. हे सरकार यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. या झोपलेल्या सरकारला जाग का येत नाही हा प्रश्नय ?
शेतकरी जसा उभ्या जगाचा पोशिंदा आहे. तसा एस.टी. कामगार ही कित्येक घरांचा पोशिंदा आहे. आज ह्या महाराष्ट्रात कित्येक गावाकडील विद्यार्थिनी उच्च शिक्षण घेत आहेत त्या फक्त आणि फक्त एस.टी. बसमुळेच,
आज महाराष्ट्रात एस.टी. चालते म्हणून कित्येक विद्यार्थी – विद्यार्थीनी शिक्षण घेऊ शकलेत. आज महाराष्ट्रात एस.ची. चालुय म्हणून कित्येक संसार चालु आहेत. आज महाराष्ट्रात एस.टी. चालुय म्हणून कित्येक नेत्यांना फुकटची मलई खायला मिळतेय. एस.टी. चालुय म्हणून कित्येक अधिकारी घडलेत बनलेत. आणि अश्या या एस.टी. कर्मचाऱ्यांचे प्रश्नच समजून घेण्याची कोणाची इच्छा नाहीये अस वाटतंय.
हे सरकार फक्त कोणत्या भांगरवाल्या नेत्याचा जावई ड्रग्स रॅकेट मध्ये अडकलाय त्याला सोडविण्यात व्यस्त आहे. किंवा जिथून मिळतंय जस मिळतंय ते लुबाडण्यात व्यस्त आहे. कित्येक कोटींची टेंडर या महामंडळाच्या नावाने काढण्यात आली पण त्याचा काय फायदा झाला ? काहीच नाही, महामंडळ जैसे थे. ह्या नेते मात्र शेटजी झाले. स्वतःला जाणता राजा म्हणविणारे बारामतीचे राजे पण ह्या विषयात बोलायला तयार नाहीत. अरे ह्या गोरगरीब एस.टी. कर्मचाऱ्यांनी प्रश्न मांडायचे तर मांडायचे कोणासमोर ?
आज ह्या महाराष्ट्रात एस.टी. कर्मचाऱ्यांना कोणीच वाली उरला नाही का ? दर वर्षी कित्येक कोटींची तरतूद वेगवेगळ्या गोष्टींसाठी सरकार करीत असते. हे सारे पैसे गेले कुठे ? एस.टी. कर्मचारी बांधवांच्यासाठी काहीच नाही करणार का ? आमच्या एस.टी. बांधवांच्या साठी एवढी उदासीनता का ? काही खाती निवांत राहून ७ वा ८ वा वेतन आयोगाच्या पगार घेत आहे. पण आमचा एस.टी. बांधवांच्या तोंडचा घास हिराविण्याच काम हे सरकार करतय ?
एक फिक्स नोकरी म्हणून मोठ्या कष्टाने एस.टी. महामंडळ मध्ये भरती झालेले आमचा गोरगरीब घरचा तरुण पण त्या तरुणाला आठ आठ वर्षांपासून पगार किती तर १३५०० रुपये फक्त आणि भत्ता किती तर २७०० रुपये फक्त निम्म्याहून अधिक पगार तर पोरांच्या शिक्षणासाठी काढलेले कर्ज फेडण्यातच चाललेत. उरलेल्या पगारात घर भाडे द्यायचे का किराणा भरायचा ? त्यात कोरोना म्हणजे आगीत तेल अशी सर्व परिस्थिती असताना हे सरकार काय झोपा काढतय काय ? आगीतून उठावं आणि फुफुटयात पडावं अशी गत झालीय. लढायची मज्जा तेव्हा येते जेव्हा समोरचा तुमचा अंत पाहत असतो. पण अंत पाहण्याची पण एक सीमा आहे.
राजकारणात गंडलेलं महामंडळ पुन्हा वैभवशाली करायचं असेल तर ह्या मंडळाच्या प्रगतीकडे लक्ष दिले पाहिजे. महामंडळ जोपर्यंत फक्त पैसे कमविण्यासाठीच साधन नाही हे ह्या नेत्यांच्या डोक्यात येत नाही तो पर्यंत महामंडळ अशीच तोट्यात राहणार..!
एस.टी. कामगारांना सुसज्ज निवास व्यवस्था, चांगले भोजन, आरोग्याची काळजी घेणे, सोबत ७ वा वेतन आयोग लागू केला पाहिजे. एस.टी. महामंडळाच्या प्रगतीसाठी काम करा ते लुटण्यासाठी नको.
सर्व कर्मचारी बांधवांना विनंती आहे. आयुष्य खूप सुंदर आहे कृपया आत्महत्या करून ते संपवू नका. आजचा प्रश्न उद्या सुटेल पण तुमच्या आत्महत्तेने अख्ख तुमचं कुटुंब रस्त्यावर येईल. कृपया आत्महत्या करू नका. जो पर्यंत आपल्या मनगटात रग आहे. श्वासात श्वास आहे तो पर्यंत लढू, आपला अधिकार मिळवूनच घेऊ.
तुमचाच
– रोहित अनिल राऊत
– अभाविप पुणे विभाग संघटनमंत्री