दैनिक स्थैर्य | दि. १३ डिसेंबर २०२४ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण अंतर्गत दि. २ जानेवारी २०२५ ते दि. ६ जानेवारी २०२५ या कालावधीत ‘श्रीमंत मालोजीराजे कृषि प्रदर्शन २०२५’चे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन श्रीमंत मालोजीराजे शैक्षणिक संकुल, जिंती नाका, फलटण येथे संपन्न होणार आहे, अशी माहिती श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
या कृषी प्रदर्शनाची माहिती देताना श्रीमंत संजीवराजे यांनी सांगितले की, या प्रदर्शनामध्ये कृषी क्षेत्रातील नवीन संशोधन व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. कृषीक्षेत्राशी निगडित २०० हून अधिक कृषी निविष्ठा कंपन्यांचा सहभाग या प्रदर्शनामध्ये असणार आहे. नामांकित ट्रॅक्टर कंपन्या, शेतीची औजारे, सेंद्रिय शेती, पशुसंवर्धन व संगोपन, डेअरी, पोल्ट्री, पॉलिहाऊस, ठिबक सिंचन, स्प्रिंकलर, बीज व रोपे, नर्सरी, जैविक तंत्रज्ञान, कृषि उपयोगी पुस्तके, ड्रोन तंत्रज्ञान, कृत्रिम बुध्दीमत्ता तंत्रज्ञान यांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे.
या प्रदर्शनादरम्यान विविध विषयांवर चर्चासत्राचे आयोजनही केले आहे. यामध्ये भविष्यातील शेतीसाठी कृत्रिम बुध्दिमत्ता, डॉ. विवेक भोईटे, कृषी विज्ञान केंद्र बारामती, भरडधान्न्याचे आहारातील महत्त्व, डॉ. प्रियदर्शनी देशमुख कृषी विज्ञान केंद्र कालवडे, कृषी उद्योजकता विकास डॉ. यु. डी. चव्हाण, प्राचार्य कृषि महाविद्यालय फलटण, शाश्वत दुग्ध व्यवसाय डॉ. शांताराम गायकवाड, गोविंद फौंडेशन फलटण यांचे मार्गदर्शन आयोजित केले आहे.
या कृषी प्रदर्शनाचा लाभ सर्व शेतकर्यांनी घ्यावा, असे आवाहनही श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी केले.