क्रीडा विभागाच्या मोबाईल ॲपमुळे पारदर्शक कामास चालना मिळेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑक्टोबर २०२२ । नागपूर । क्रीडा विभागाच्या मोबाईल ॲपमुळे खेळाडू व क्रीडा संस्था, मार्गदर्शक व पालकांना विभागामार्फत राबविले जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती मिळेल. त्यासोबतच क्रीडा विभागाच्या कामात पारदर्शकता येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल येथे केले.

डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत क्रीडा विभागाच्या संकेतस्थळ व मोबाईल ॲपचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, सर्वश्री आमदार ना. गो. गाणार, प्रवीण दटके, अभिजीत वंजारी, सुनील केदार, समीर मेघे, राजू पारवे, मोहन मते, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, टेकचंद सावरकर, अॅड. आशिष जायस्वाल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, अतिरिक्त आदिवासी आयुक्त रवींद्र ठाकरे, जिल्हा पोलीस अधीक्षक विजय मगर, नियोजन उपायुक्त धनंजय सुटे, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारे सुरु करण्यात आलेले उपक्रम, क्रीडा विभागाच्या योजना, योजनांचे लाभार्थी, क्रीडा संकुले, क्रीडा क्षेत्रातील अद्ययावत माहिती, क्रीडा पुरस्कार व पुरस्कारार्थींची माहिती, क्रीडा विभागामार्फत जिल्ह्यात राबविले जाणारे विविध उपक्रम या सर्व विषयांची माहिती या संकेतस्थळाच्या माध्यमातून सर्वांकरिता उपलब्ध होणार असल्याचे उपमुख्यमंत्री यांनी सांगितले.

या संकेतस्थळ व मोबाईल ॲपमुळे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त खेळाडू तसेच पालक क्रीडा संस्थापर्यंत क्रीडा विभागाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार असून याचा लाभ खेळाडू, क्रीडा संस्था व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!