व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ महत्त्वाचा – क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ ऑगस्ट २०२२ । मुंबई । मोबाईल आणि संगणकाच्या युगात आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे. मुलांना शालेय जीवनापासून मैदानी खेळासाठी वेळ दिला पाहिजे. शाळेत शारीरिक शिक्षणाचा तास पुन्हा सुरु करणे आवश्यक असून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात खेळाला विशेष महत्त्व असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉन बॉस्को विद्यालयात ऑलिम्पिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या क्रीडापटूंचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करण्यात आले.

मंत्री श्री. महाजन म्हणाले, व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ महत्त्वाचा आहे. खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी देशात दरवर्षी 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. हॉकीचे जादूगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेजर ध्यानचंद यांचा या दिवशी जन्म झाला आणि त्यांच्या स्मरणार्थ क्रीडा दिन साजरा केला जातो. मेजर ध्यानचंद यांचे देशातील हॉकी खेळासाठी मोठे योगदान आहे. त्यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा झेंडा फडकावला होता आणि हॉकीमध्ये तीन वेळा देशाला सुवर्णपदक मिळवून दिले होते. क्रीडा दिनानिमित्त देशाचे राष्ट्रपती हे द्रोणाचार्य, मेजर ध्यानचंद आणि अर्जुन पुरस्कार देऊन खेळाडूंचा गौरव करतात. मेजर ध्यानचंद हे भारतीय क्रीडा क्षेत्रातील एक प्रेरणादायी आणि व्यक्तिमत्व आहे. सरकारने ध्यानचंद यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविले आहे.

राष्ट्रकुल आणि खेलो इंडिया स्पर्धांमधील विजेत्या खेळाडूंच्या बक्षीसांच्या रकमेत मोठी वाढ

मंत्री श्री. महाजन म्हणाले, देशातील पंजाब, हरियाणा या राज्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरिता देत असलेल्या बक्षीस रक्कमेच्या तुलनेत राज्य देत असलेली रक्कम कमी होती. ती जवळपास 5 पट वाढविण्यात आली आहे. पूर्वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना 10 लाख रुपये देण्यात येत होते. आता ती रक्कम 50 लाख रुपये करण्यात आली आहे. रौप्यपदक विजेत्या खेळाडूंसाठी 7.50 लाख रुपयांऐवजी 30 लाख रुपये करण्यात आली आहे. तर कांस्यपदक विजेत्या खेळाडूंना 5 लाख रुपयांऐवजी 20 लाख रुपये करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ‘खेलो इंडिया’ या स्पर्धेच्या पदक विजेते आणि सहभागी खेळाडूंना पूर्वीपेक्षा तिप्पट रकमेची बक्षीसे देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री श्री. महाजन म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडूंशी थेट संवाद साधतात. तसेच पदक विजेत्यांचे प्रत्यक्ष भेटून अभिनंदन करतात. ते खेळांकडे गांभीर्याने बघतात.

अभ्यासाबरोबरच खेळही महत्त्वाचा…

स्वस्थ शरीरातच स्वस्थ मनाचा विकास होतो. जी मुले अभ्यासाबरोबरच खेळातही भाग घेतात ती चपळ, उत्साही असतात. त्यांची हाडे मजबूत आणि चेहरा तजेलदार होतो. पचनशक्ती चांगली राहते. डोळे चांगले राहतात, शरीर वज्राप्रमाणे होते. व्यायाम न केल्यास मनुष्य आळशी व निस्तेज बनतो असे त्यांनी सांगितले.

खेळात कधी आपण जिंकतो तर कधी हरतो. त्यामुळे आपल्या अंगी खिलाडूवृत्ती विकसित होते. एक प्रकारची निकोप स्पर्धा निर्माण होते. संघभावना वाढीस लागते. पुढे जगात वावरताना आपल्याला चारचौघांना घेऊन कसे चालायचे ते समजते. त्यामुळेच खेळांचे महत्त्व फार आहे. सर्वांनाच लहानपणी खेळायला मिळाले पाहिजे. प्रत्येक बालकाचा तो हक्कच आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

चर्चगेट येथील हॉकी मैदानात अभिवादन आणि हॉकी सामन्यास सुरुवात

तत्पूर्वी मंत्री गिरीष महाजन यांनी चर्चगेट येथील हॉकी मैदानात सकाळी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि हॉकी सामना खेळणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा देऊन सामना सुरू केला.

या कार्यक्रमास शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण सचिव रणजित सिंह देओल तसेच पुरस्कारप्राप्त खेळाडू एम. एम. सोमय्या, कमलेश मेहता, प्रदीप गंधे, जय कवळी डॉन बास्को शाळेच मुख्याध्यापक फादर क्रीस्पियानो आदींची उपस्थिती होती. यावेळी शालेय विद्यार्थिनींनी विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले. प्रास्ताविक उपसंचालक स्नेहल साळुंके, सूत्रसंचालन प्रियंका बुवा यांनी तर आभार मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी अभय चव्हाण यांनी मानले.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ऑलिंपिक व आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी केलेल्या खेळाडूंचा सत्कार

एम. एम. सोमय्या हॉकी ऑलिंपिक सुवर्णपदक प्राप्त खेळाडू, कमलेश मेहता टेबल-टेनिस अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू, प्रदिप गंधे बॅडमिंटन ध्यानचंद पुरस्कार प्राप्त खेळाडू, जय कवळी बाक्सिंग ऑलिंपिक स्पर्धा, हिमाजी परब अर्जुन पुरस्कारप्राप्त मल्लखांब, शिवाजी पाटील फुटबॉल शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू, वर्षा उपाध्ये रिदमिक जिमनॅस्टिक्स शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू व मार्गदर्शक, प्रशांत मोरे कॅरम जागतिक विजेतेपद प्राप्त खेळाडू, अब्दुल हमिद खान – बास्केटबॉल शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू, नताशा जोशी – नेमबाजी डेफ ऑलिंपिक्स सहभाग, रिचा रवी बास्केटबॉल आंतरराष्ट्रीय खेळाडू, वैभवी इंगळे – तलवारबाजी जागतिक कॅडेट स्पर्धा, सौम्या परुलकर रिदमिक जिमनॅस्टीक्स जागतिक शालेय स्पर्धा सानिया कुंभार रिदमिक जिमनॅस्टिक्स जागतिक शालेय स्पर्धा, मिहिका बांदिवडेकर रिदमिक जिमनॅस्टीक्स जागतिक शालेय स्पर्धा, वैभवी बापट रिदमिक जिमनॅस्टीक्स जागतिक शालेय स्पर्धा, सृष्टी पटेल रिदमिक जिमनॅस्टिक्स जागतिक शालेय स्पर्धा, जान्हवी वर्तक रिदमिक जिमनॅस्टिक्स जागतिक शालेय स्पर्धा, निश्का काळे रिदमिक जिमनॅस्टिक्स जागतिक शालेय स्पर्धा. या खेळाडूंचा सत्कार यावेळी क्रीडा मंत्री श्री. गिरीष महाजन यांच्या हस्ते करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!