दैनिक स्थैर्य । दि. १२ डिसेंबर २०२१ । सातारा । जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघ यांच्यावतीने सातारा जिल्ह्यातील पक्षकारांची वाद व वादपूर्व प्रकरणे ही सामंजस्याने व सुसंवादाने तडजोडीने निकाली निघण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण 11 हजार 646 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव तृप्ती जाधव यांनी दिली.
या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्ह्यात 11407 प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी 1480 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली. यामध्ये 13 कोटी 42 लाख 52 हजार 10 रुपये 30 पैश्यांची वसूली करण्यात आली. तसेच वादपूर्व 11833 प्रकरणे ठेवण्यात आली त्यापैकी एकूण 9169 प्रकरणे निकाली निघून 6 कोटी 69 लाख 73 हजार 53 रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली. लोकअदालतीमध्ये एकूण 10 हजार 649 प्रकरणे तडजोडीने निघाली. तसेच 8 ते 10 डिसेंबर कालावधीत स्पेशल ड्राईव्हमध्ये 997 प्रकरणे निकाली काढण्यात आली, अशी सातारा जिल्ह्यामध्ये वाद व वादपूर्व एकूण 11 हजार 646 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली.
या लोकअदालतीमध्ये वैवाहिक वाद, भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाईचे प्रकरणे, कर्ज धनादेश न वठल्याचे प्रकरणे इत्यादींचा समावेश आहे. वादपूर्व प्रकरणात पतसंस्था, फायनान्स कंपन्या, बँकांची कर्जे, दुरध्वनी व विद्यूत देयके आणि ग्रामपंचायत मालमत्ता, पाणी पट्टी कर वसूली इत्यादी प्रकरणांचा समावेश होता. ही लोकअदालत यशस्वी होण्यासाठी पक्षकार, विधिज्ञ, सर्व न्यायिक अधिकारी, पोलीस, विधी स्वयंसेवक आणि सर्व न्यायालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रीय लोक अदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून भविष्यात आणखी प्रबोधन आणि प्रयत्न करणार असल्याची माहिती प्राधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तृप्ती जाधव यांनी दिली.