दैनिक स्थैर्य । दि. ०९ जुलै २०२३ । गडचिरोली । ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाने सर्वसामान्य जनतेच्या दारी शासनाच्या योजना पोहोचल्या असून राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्याने आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले असून जिल्ह्याच्या ११ लाख लोकसंख्येपैकी सुमारे ६ लाख ९७ हजार लाभार्थ्यांना जिल्हा प्रशासनाने शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोली येथे आज जिल्हास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ झाला. कार्यक्रमास मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, पद्मश्री परशुराम खुणे, विधानसभा सदस्य देवराव होळी, विधानसभा सदस्य कृष्णा गजबे, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मिणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल आदींसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, शासनाच्या एक वर्षपूर्तीनंतर पहिलाच कार्यक्रम गडचिरोली येथे आयोजित केला आहे. ‘शासन आपल्या दारी’ ही संकल्पना सर्वसामान्यांसाठी आहे, लोकांना सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागू नये यासाठी सरकारने हा उपक्रम सुरु केला. जिल्ह्याची लोकसंख्या ११ लाख असून जवळपास ६ लाख ९७ हजार लाभार्थ्यांना सुमारे ६०१ कोटी रुपयांच्या विविध योजनांचा जिल्हा प्रशासनाकडून लाभ दिला जात आहे. शासन प्रशासन ही रथाची दोन चाके आहेत, अधिकारी आता गावागावात जात असल्यामुळे हे सर्वसामान्यांचे सरकार आहे अशी प्रचिती जनतेला येत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम, कौशल्य विकास प्रशिक्षण, रोजगार मेळाव्यातून तरुणांना रोजगार उपलब्ध होत आहे. लोकहितासाठी आतापर्यंत राज्य सरकारने ४०० पेक्षा अधिक धोरणात्मक निर्णय घेतल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
गडचिरोलीमध्ये स्टील सिटी उभारण्याचे नियोजन – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जनतेपर्यंत शासन पोहोचले पाहिजे या संकल्पनेतून शासनाने हा उपक्रम सुरू केला आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान ७५ हजार लाभार्थ्यांना निवडायचे उद्दिष्ट होते. मात्र गडचिरोलीने सर्व रेकॉर्ड तोडून जवळपास ७ लाख लोकांना लाभ दिला आहे. विशेष म्हणजे यापैकी ५० टक्के लाभार्थी हे अति दुर्गम भागातील आहेत असे सांगून छत्तीसगड, झारखंडच्या धर्तीवर गडचिरोलीमध्येही स्टील सिटी उभी करण्याचे नियोजन असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.
मी मुख्यमंत्री असताना येथील खनिज प्रकल्पाला चालना दिली. येथेच गुंतवणूक, येथेच रोजगार आणि नफा सुद्धा गडचिरोलीमध्येच हे धोरण अवलंबिले. ३० हजार कोटींची गुंतवणूक गडचिरोलीसाठी मंजूर करण्यात आली असून यासाठी लागणाऱ्या सर्व परवानगी देण्यात आल्या आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता देवून कृषी विद्यालयाची जागा उपलब्ध करून दिली आहे असे ते म्हणाले. तसेच गडचिरोलीमध्ये मोठे विमानतळ होण्यासाठी १४६ हेक्टर जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे मोठे उद्योगही येथे येण्यास मदत होईल. जिल्ह्यातील एकही आदिवासी घरकुलापासून वंचित राहणार नाही, सर्वांना योजनेतून घरकुल उपलब्ध करुन देण्याची ग्वाहीही यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.
प्रस्तावित विमानतळ व समृद्धीमुळे जिल्ह्यात विकासाचा वेग वाढेल- उपमुख्यमंत्री अजित पवार
जिल्ह्यात प्रस्तावित विमानतळ आणि समृद्धी महामार्ग यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील विकासाचा वेग वाढेल, असा विश्वास व्यक्त करतानाच जिल्ह्याला मंत्रिपद मिळाल्यामुळे विकास कामांना गती मिळेल अशी खात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्ह्यातील युवकांना जास्तीत- जास्त रोजगार मिळाल्यास इतर घटकांकडून होणारा त्रास होणार नाही. तसेच लोकांच्या डोक्यातून नक्षलवादही संपेल असेही ते म्हणाले.
मंत्री धर्मराव आत्राम यानीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमानंतर स्थानिक युवकांनी रेला हे पारंपारीक नृत्य सादर केले. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मंत्री यांनी युवकांबरोबर नृत्यात सहभाग घेतला.
योजनांच्या लाभ वितरणासह विविध मान्यवर, युवकांचा सन्मान
‘शासन आपल्या दारी’ निमित्त आयोजित महाशिबिरादरम्यान मान्यवरांच्या हस्ते जिल्हयातील पद्मश्रीप्राप्त जेष्ट कलाकार परशुराम खुणे यांचा सन्मान करण्यात आला. १० मीटर शुटींगमध्ये राष्ट्रीय विजेता महेश ठवरे, सिकई मार्शल आर्टमधील एंजल देवकुले यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच विविध योजनांमधील लाभार्थ्यांना वैयक्तिक योजनांचे लाभही प्रातिनिधिक स्वरुपात वितरीत करण्यात आले. यात जानु मट्टामी (शबरी आवास), राजेश मडावी (गोडावून अंतर्गत चेक वाटप), नंदा सयाम (मानव विकास-वाहन), तानुबाई गावडे (श्रावणबाळ पेंशन योजना) राधा तुमरेडी (संजय गांधी निराधार) यांना योजनांचा लाभ देण्यात आला. विविध योजनांमधून लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, सायकल, रिक्षा, घंटागाडी, शेतीपयोगी यंत्रसामुग्री, दिव्यांगांना सायकली आदी साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
निवासी शाळा, वसतीगृह, आयसीयू, पोलीस प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय मुलांची शासकीय निवासी शाळा, गडचिरोली मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह (गुणवंत), गडचिरोली, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, चामोर्शी या दोन वसतीगृह व एक शासकीय निवासी शाळा या इमारतींचे दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत ४२ खाटांचे पेडियाट्रिक मॉड्युलर आयसीयू, कोविड-१९ कार्यक्रम कृती आराखड्यांतर्गत ५० खाटांचे मॉड्युलर आयसीयूचेही यावेळी ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. पोलीस विभागाच्या मुरूमगाव येथील नवीन प्रशासकीय इमारतीचेही लोकार्पण यावेळी करण्यात आले.