राजर्षी शाहू जयंतीनिमित्त आयोजित समता दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २६ जून २०२२ । मुंबई । लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त दसरा चौकात आयोजित करण्यात आलेल्या समता दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षात होणाऱ्या या जन्मदिनी प्रशासनाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. दसरा चौक येथे आयोजित समता दिंडीचे उद्घाटन श्री शाहू महाराज छत्रपती व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले. यावेळी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ प्रमुख उपस्थित होते. यावेळी आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, ज्येष्ठ इतिहास तज्ञ डॉ. जयसिंगराव पवार, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
दसरा चौकात सुरुवात झालेली समता दिंडी पुढे -व्हिनस कॉर्नर- माई महाराजांचा पुतळा- बिंदू चौकात येवून या दिंडीचा समारोप झाला.

या समता दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ, झांज, ढोल ताशा, लेझीम आदी कलाप्रकार सादर केले. एन.सी.सी., एन.एस.एस., स्काऊट गाईडचे विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाले. शाहू महाराजांच्या वेशभूषेत उपस्थित मुलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जिल्हा समाजकल्याण कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या चित्ररथामध्ये पारंपरिक वेषभुषा परिधान करुन जिवंत देखावा सादर करण्यात आला. कोल्हापूर नगरी ही खेळाडूंची नगरी असल्याने कुस्ती, फुटबॉल सह इतर खेळाडू त्यांच्या खेळाशी निगडीत वेषभूषा करुन यावेळी या दिंडीमध्ये सहभागी झाले होते. तर बहुतांशी विद्यार्थी-विद्यार्थिनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले. भर पावसात देखील विद्यार्थ्यांचा उत्साह अवर्णनीय होता. जिल्हा प्रशासन व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाद्वारे आयोजित समता दिंडी साठी विविध विभागांनी सहभाग घेतला.

दरम्यान शाहिरी पोवाड्यातून राजर्षी शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी विविध शाळांचे शेकडो विद्यार्थी, शाहू प्रेमी, इतिहास प्रेमी नागरिक उपस्थित होते.

राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन

दरम्यान श्री शाहू महाराज छत्रपती, पालकमंत्री सतेज पाटील, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दसरा चौक येथे राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करुन पुष्पहार अर्पण केला व अभिवादन केले. यावेळी आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, ज्येष्ठ इतिहास तज्ञ डॉ. जयसिंगराव पवार, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, वसंतराव मुळीक यांनीही आदरांजली वाहिली. यावेळी इतिहास प्रेमी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!