दैनिक स्थैर्य । दि. 11 ऑक्टोबर 2021 । फलटण । उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपूर खीरी येथील शेतकर्यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र विकास आघाडीने आज ’महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. त्यानुसार फलटण शहरातही या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदींनी शहरातील श्रीमंत मालोजीराजे पुतळापरिसरात जमून सदर घटनेतील शेतकर्यांना आदरांजली वाहून केंद्र सरकारचा निषेध केला.
यावेळी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर, नगराध्यक्षा सौ. नीता मिलिंद नेवसे, ‘महानंदा’ डेअरीचे उपाध्यक्ष डी.के.पवार, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सुर्यवंशी – बेडके, फलटण तालुका शिवसेना प्रमुख प्रदीप झणझणे यांच्यासह राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या जाचक कृषी कायद्याविरोधात शेतकर्यांचे आंदोलन सुरु असताना केंद्र सरकारकडून अशा प्रकारे अत्यंत निर्दयीपणे शेतकर्यांचे हत्याकांड होत असेल तर शेतकर्यांवर झालेल्या या अन्यायाविरोधात संपूर्ण देश शेतकर्यांच्या पाठीशी उभा राहील. त्याचाच भाग म्हणून आजचा बंद पाळण्यात येत असल्याचे यावेळी बोलताना आमदार दीपक चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी श्रीमंत रघुनाथराजे, श्रीमंत संजीवराजे, डी.के.पवार, महेंद्र बेडके, प्रदीप झणझणे यांनीही मनोगत व्यक्त करुन केंद्र सरकारचा निषेध केला.
दरम्यान, महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला फलटणकरांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील व्यापार्यांनी आपले सर्व दैनंदिन व्यवहार बंद ठेवल्यामुळे नेहमी गजबजलेल्या बाजारपेठेत शुकशुकाट पहायला मिळाला. पृथ्वी चौक, नाना पाटील चौक, जिंती नाका, डी.एड.चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा फुले चौक आदी सर्व ठिकाणची अत्यावश्यक सेवा वगळाता इतर दुकाने व्यापार्यांनी बंद ठेवून महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला आपला पाठींबा दर्शवला.