दैनिक स्थैर्य । दि. २१ फेब्रुवारी २०२२ । फलटण । खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या ४४ व्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी तालीम मंडळाचे प्रमुख बबलू मोमीन व त्यांचे सहकारी मित्र मंडळाने पंढरपूर ब्लड बँकेच्या सहकार्याने आयोजित महारक्तदान शिबीरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान केले.
जिल्हा परिषद व जिल्हा नियोजन मंडळ सदस्या अड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी रक्तदान शिबीराचे उदघाटन करताना रक्तदाते व सहभागी कार्यकर्त्याना धन्यवाद दिले. या भव्य रक्तदान शिबीरात सुमारे २५४ रक्तदात्यांनी रक्तदान करुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या रक्त टंचाईवर मात करुन विविध रुग्णालयात दाखल रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची रक्ताची चिंता दूर करण्यात महत्वाची भूमिका निभावली आहे.
खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या महारक्तदान शिबीरास भेट देवून रक्तदात्यांचे या राष्ट्रीय कार्यक्रमात सक्रिय सहभागाबद्दल आभार मानले, रक्तदात्यांना दिलेल्या भेट वस्तूंबद्दल संयोजकांचे कौतुक केले. बबलू मोमीन व सहकाऱ्यांच्या शुभेच्छा स्वीकारुन खासदारांनी त्यांना धन्यवाद दिले.
या महारक्तदान शिबीरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, सुमारे १००/१२५ महिला उत्स्फूर्तपणे रक्तदानासाठी शिबीर स्थळी दाखल झाल्या मात्र त्यांचे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याने त्यांचे रक्तदान स्वीकारण्यास रक्त पेढीने असमर्थता व्यक्त केली, केवळ २५ महिलांचे हिमोग्लोबिन व्यवस्थित आढळल्याने त्यांचे रक्तदान स्वीकारण्यात आले.
यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व अड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर या दाम्पत्याचा बबलू मोमीन व सहकाऱ्यांनी यथोचित सत्कार केला.