दैनिक स्थैर्य । दि. ०२ जानेवारी २०२३ । फलटण । देहात ही कंपनी शेतकऱ्यांना शेती व दुग्ध व्यवसायाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी तज्ज्ञांचा सल्ला, दर्जेदार बी- बियाणे, खते, अवजारे पशू खाद्य पुरवठा, हवामान-आधारित पीक विमा संरक्षण आणि उत्पादित शेतमाल विक्री यासह सर्वतोपरी सहकार्य करणारी कंपनी असून गेल्या सुमारे १० वर्षांपासून देशातील ११ राज्यात आणि ८ महिन्यांपासून महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यात शेतकऱ्यांना मदतीचा हात देत कंपनीने आपले कार्य सुरु केले आहे. सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होऊन लाभ घ्या असे आवाहन देहात पशू खाद्य विभाग व्यवस्थापक संदीप शेळके यांनी केले.
देहात कंपनीच्या कार्य पद्धतीची माहिती देणे, शेतकऱ्यांच्या अपेक्षा जाणून घेऊन त्यांना योग्य सहकार्य करणे आणि पशूधनाच्या संरक्षण व सांभाळासाठी असलेल्या विविध सेवांची माहिती देण्यासाठी राजाळे, ता. फलटण येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना संदीप शेळके बोलत होते.
यावेळी राजाळे विकास सोसायटी चेअरमन राहुल निंबाळकर, नीलकंठ धुमाळ, लघु सर्व पशू चिकित्सालय फलटणचे सहाय्यक आयुक्त डॉ. पवार, विस्तार अधिकारी डॉ. नंदकुमार फाळके, डॉ. गावडे, कंपनीचे अधिकारी, एरिया बिझनेस मॅनेजर कैवल्य कुलकर्णी, बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर लौकिक कामठे, विस्तार व्यवस्थापक अक्षय कुतवळ, मार्केटिंग मॅनेजर प्रसाद मेस्त्री व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रसाद मेस्त्री यांनी कंपनीच्या विविध सेवा तसेच पीक पोषण उत्पादने, पशू खाद्य व अन्य शेती उत्पादनांची माहिती देत कंपनी शेतकऱ्यांना शेती-विषयक सर्वांगीण सुविधा देण्यास कार्यरत असल्याचे निदर्शनास आणून देत सर्व शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
देहात कंपनीचे एरिया बिझनेस मॅनेजर कैवल्य कुलकर्णी यांनी सातारा जिल्ह्यात ७०हुन अधिक कृषी सेवा केंद्रांच्या माध्यमातून कंपनीच्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध करुन देत असून वाई येथे कंपनीने स्ट्रॉबेरी खरेदी केंद्र सुरु केल्याचे निदर्शनास आणून दिले.
पशू संवर्धन उपायुक्त डॉ. पवार यांनी लंपी आजाराबाबत मार्गदर्शन करताना आजाराची लक्षणे, उपाय, आजार होऊ नये यासाठी घ्यावयाची दक्षता याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. स्वच्छ गोठा योजनेबद्दल माहिती देवून गोठा स्वच्छ व निर्जंतुक असेल तर लंपी काय कोणताही आजार उद्भवणार नाही याची ग्वाही दिली.
पशूधन विकास अधिकारी डॉ. नंदकुमार फाळके यांनी मागासवर्गीय, अल्पभूधारक आणि सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी गाई, म्हैस शेळ्या आणि मेंढ्या खरेदी यासाठी असलेल्या शासकीय योजना व अनुदाने तसेच कोंबडी पालन योजनेतील सवलती याविषयी सविस्तर माहिती देवून मार्गदर्शन केले.
गावातील प्रतिष्ठित नागरिक नीळकंठ धुमाळ यांनी कंपनीच्या योजना आणि काम करण्याची पद्धती शेतकऱ्यांच्या हिताची आणि मार्गदर्शक आहे व राजाळे विकास सोसायटीतर्फे देहात कंपनीला त्यांच्या राजाळे गावातील कार्यासाठी सर्वतोपरी सहकार्य देण्याची हमी देऊन कंपनीने गावात आपले कार्य सुरु करण्याच्या दृष्टीने पुढील पाऊले उचलावीत, अशी विनंती उपस्थितांच्या वतीने केली.
कंपनीचे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर लौकिक कामठे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन, समारोप व आभार प्रदर्शन केले.