दैनिक स्थैर्य | दि. १६ नोव्हेंबर २०२४ | फलटण | महायुती पुरस्कृत फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पत्नी तथा सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अॅड.सौ.जिजामाला नाईक निंबाळकर यांनी कापडगांव, मिरेवाडी या गावात प्रचार दौरा केला. त्यांच्या या दौर्यास मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना गावातील चिमुकल्यांनीही ‘एकच वादा, रणजितदादा’ अशी घोषणा देत प्रचाराचा आनंद लुटला. चिमुकल्यांच्या सहभागामुळे प्रचारातील नेते मंडळींचा ताण-तणाव दूर झाल्याचेही पहायला मिळाले.
फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वात सचिन पाटील राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. मतदानाची तारीख जवळ आल्याने उमेदवारांची प्रचारयंत्रणा जोमात सुरु आहे. अॅड.सौ.जिजामाला नाईक निंबाळकर यांनीही प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून याच प्रचारदौर्याचा भाग म्हणून त्यांनी नुकताच कापडगांव, मिरेवाडी भागाचा दौरा केला.
या प्रचारदौर्यादरम्यान अॅड.सौ.जिजामाला नाईक निंबाळकर यांनी गावातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटी घेवून घोंगडी बैठकीद्वारे मतदारांशी संवाद साधल्याचे पहायला मिळाले. अॅड.सौ.जिजामाला नाईक निंबाळकर यांनी उपस्थितांसमवेत जमिनीवरच बसून आपली भूमिका मांडतानाचे चित्र या दौर्यादरम्यान पहायला मिळाले. विशेष म्हणजे गावातील चिमुकल्यांनी उत्साहाने ‘एकच वादा, रणजितदादा’ अशी घोषणाबाजी करुन प्रचारात रंगत आणली आणि प्रचारासाठी आलेल्या नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांचा उत्साहही वाढवला.
दरम्यान प्रचारादरम्यान, ‘‘माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या खासदारकीच्या काळात केंद्रातून मोठ्या प्रमाणावर निधी आणून कोट्यावधीची विकासकामे तालुक्यात सुरु केलेली आहेत. रेल्वे, रस्ते, पाणी यावर अल्पकाळात फार मोठे काम त्यांनी करुन दाखवले आहे. येणार्या काळात सचिन पाटील यांना तुम्ही निवडून दिल्यास रणजितदादांची ताकद वाढणार आहे. शेजारच्या बारामती तालुक्याप्रमाणे आपला फलटण तालुका विकासात पुढे जायला पाहिजे होता; परंतु प्रस्थापित सत्ताधार्यांना ते जमले नाही. आता मतदारांना चांगली संधी असून मतदारसंघाचा सर्वार्थाने विकास करण्यासाठी सचिन पाटील यांना विजयी करा’’, असे आवाहन अॅड.सौ.जिजामाला नाईक निंबाळकर यांनी मतदारांना केले.
‘‘महायुती सरकारच्या काळात महिला, युवा, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांसाठीच मोठ्या प्रमाणांवर योजना सुरु करण्यात आल्या आहेत. राज्यात जर सत्ताबदल झाला तर या योजना सुरु राहण्याची शाश्वती नाही. त्यामुळे तुमच्या फायद्याच्या योजना सुरु राहण्यासाठी राज्यात महायुतीचे सरकार येणे गरजेचे असून हे सरकार आणण्यासाठी सचिन पाटील यांना तुम्ही भरघोस मतांनी निवडून द्या’’, असेही आवाहन अॅड.सौ.जिजामाला नाईक निंबाळकर यांनी केले आहे.