
दैनिक स्थैर्य । 21 मे 2025। सातारा । ज्ञानविकास मंडळाच्यावतीने सुरू असलेल्या वसंत व्याख्यान-जयमालेच्या 52 व्या सत्रात शनिवारी प्रसिद्ध नाट्य, चित्रपट अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांची मुलाखत घेण्यात आली.मुंबईचे निवेदक आणि मुलाखतकार प्रदीप देसाई यांनी मुलाखत घेतली. प्रतीक्षा लोणकर यांनी आपला संपूर्ण नाट्य-चित्रपट प्रवास सातारकरांसमोर उलगडला.
प्रदीप देसाई यांनी प्रतीक्षाताईंना अनेकविध प्रश्न विचारून बोलतं केलं. पूर्वी औरंगाबाद म्हणजेच आताच्या संभाजीनगरच्या रहिवासी असल्याने त्यांचा नाट्यप्रवास हा तेथून सुरू झाला. त्यामध्ये यश मिळू लागल्यावर त्यांच्या ग्रुपने म्हणजेच त्या स्वतः, लेखक प्रशांत दळवी, चंद्रकांत कुलकर्णी आणि इतर काही अशा मंडळींनी मुंबईला या क्षेत्रात करिअर करण्यासाठी जायचे ठरवले. प्रतीक्षा लोणकर यांची मराठी माणसाला खरी ओळख ही दामिनी या दूरदर्शनवरील त्या काळी गाजलेल्या मालिकेने झाली.
एका प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, प्रिया तेंडुलकर यांनी दामिनी करताना अतिशय प्रोत्साहन दिले. तुझी यातली भूमिका खूप गाजणार आहे. तुला आयुष्यभर ही भूमिका पुरून उरणार आहे असेही त्यांनी सांगितले. अभिनेत्री लालन सारंग यांच्याबरोबर लग्न हे नाटक केल्यामुळे त्यांच्याशी दामिनीमध्ये काम करताना ट्युनिंग चांगलं जमलं होतं. दामिनीसारख्या भूमिका मला नंतर देखील मिळाल्या पण मी त्या नाकारल्या, कारण त्याच त्याच प्रकारच्या भूमिका पाहून प्रेक्षक कंटाळतात. दामिनीमुळे माझ्यात एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला. अलीकडे आलेल्या जिजाऊ या मालिकेसंबंधी देखील त्यांनी आपल्या काही आठवणी कथन केल्या. त्या म्हणाल्या, जिजाबाई या शिवाजी महाराजांच्या आईपेक्षासंभाजी महाराजांच्या त्या आजी होत्या हे या मालिकेदरम्यान मी समजून घेतलं. त्यामुळे आजीच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची होती. जी भूमिका करताना अतिशय त्रास होतो ती भूमिका सर्वश्रेष्ठ म्हणावी लागेल. चार चौघी सारखे नाटक हे 25 व्या प्रयोगानंतर शेवटपर्यंत हाउसफूल गेले.
मलेरियाचा ताप असताना देखील वंदना गुप्ते यांच्या आग्रहास्तव चार चौघीचा प्रयोग केला, तो अतिशय उत्तम प्रयोग झाला. जुही चावला यांचे सेक्रेटरी के. संजय हे भेट चित्रपट पहायला आले होते आणि माझा भेट चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी इकबाल या हिंदी चित्रपटासाठी माझी शिफारस केली. अभिनय क्षेत्रात आपण समाधानी आहातका या प्रश्नावर त्या म्हणाल्या, अभिनय क्षेत्रात मी आजपर्यंत पूर्ण समाधानी नाही. अजूनही वेगवेगळ्या भूमिका करायला मला आवडेल. दिग्दर्शनापेक्षा एखाद्या इंग्रजी वाययाचे भाषांतर करायला मला आवडेल. पुरस्कारसिंबंधी त्या म्हणाल्या, नाट्य चित्रपट क्षेत्रात सुरुवातीच्या काळात पुरस्कारांचे महत्त्व खूप असतं. हे पुरस्कार अभिनेत्याला प्रेरणा देणारे ठरतात. ही मुलाखत सातारकर रसिक श्रोत्यांना विशेष आवडली, वसंत व्याख्यानमालेचे आठवे पुष्प हिंदी गीतांच्या कार्यक्रमानै गुंफले गेले.
या दिवशी सातार्यातील गायक कलाकार राजेंद्र पाटील, अजय घोरपडे, रमिजा सय्यद, गीता उधानी आणि विनय कुलकर्णी यांनी साज और आवाज प्रस्तुत जुन्या हिंदी गाण्यांचा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमात अनेक गाण्यांना श्रोत्यांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. वसंत व्याख्यानमाला गुरुवार, दि. 22 मे अखेर नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये सुरू राहणार आहे. दि. 22 मे रोजी शिवसेनेचे आ. अनिल परब यांच्या हस्ते वसंत व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे.