
सातारा – कीर्तन सादर करताना कीर्तनकार ह.भ.प. दीपाताई भंडारे. (छाया – अतुल देशपांडे, सातारा)
स्थैर्य, 13 फेब्रुवारी, सातारा : श्री समर्थ सेवा मंडळ ,सज्जनगड यांच्यावतीने सातारा येथील श्री समर्थ सदन येथे दासनवमी निमित्त 9 दिवस आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथराज दासबोध पारायण आणि कीर्तन प्रवचन कार्यक्रमाची सांगता पुण्यातील प्रसिद्ध रामदासी कीर्तनकार ह.भ.प. दीपाताई भंडारे यांच्या अत्यंत प्रभावी आणि सुश्राव्य रामदासी कीर्तनाने झाली. सातारकर श्रोत्यांचा त्यांच्या कीर्तनाला अतिशय उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
समर्थ भक्त दीपाताई भंडारे यांनी दासनवमी च्या पूर्वसंध्येला सर्वाथाने उचित ठरलेल्या योगीराज कल्याण स्वामी महाराज यांच्या ’तो मज आवडतो मम स्वामी, निशी दिनी अंतर्यामी ’ या लोकप्रिय अभंगावर अत्यंत सखोल आणि भावपूर्ण निरूपण पूर्व रंगात सादर केले तर उत्तररंगात श्री समर्थांना आणि योगीराज कल्याण स्वामींना श्री दत्त दर्शन हे आख्यान अतिशय रंगतदारपणे सादर केले या अप्रतिम कीर्तनाला श्रोत्यांचा मनःपूर्वक भरभरून प्रतिसाद मिळाला,तेव्हा श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला . आपल्या तेजस्वी सुरेल आणि भावपूर्ण गायनाने त्यांनी ची मने जिंकली.
दीपाताई या उत्तम लेखिका,मुक्तपत्रकार,आकाशवाणी पुणे केंद्रावर वृत्तनिवेदिका आणि गायनात संगीत अलंकार पदवीप्राप्त असून,त्यांच्या दीर्घ आणि व्यापक अनुभवाचे प्रतिबिंब त्यांच्या कीर्तनातही उपस्थितांना जाणवले! अभ्यासपूर्ण ओघवते वक्तृत्व, सुरेल परिपक्व आणि शास्त्रीय संगीतातील रागांवरआधारित गायन,यामुळे श्रोते दीपाताईंच्या कीर्तनाने मंत्रमुग्ध झाले ! त्यांना हार्मोनियमवर बाळासाहेब चव्हाण तर तबल्यावर विश्र्वनाथ पुरोहित यांनी उत्तम समर्पक साथ केली.या सर्व कलाकारांचा सत्कार समर्थ सेवा मंडळाचे वतीने ज्येष्ठ समर्थ भक्त व समर्थ विद्यापीठाचे समर्थभक्त कुलपती रमेशबुवा शेंबेकर आणि सौ.कल्पना ताडे यांच्या हस्ते करण्यात आला .सदर कार्यक्रमास समर्थ विद्यापीठाचे आदरणीय समर्थ भक्त शेंबेकरबुवा, तसेच सुरेश काळे, गजानन बोबडे, संतोष वाघ, राजाभाऊ कुलकर्णी, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

