दैनिक स्थैर्य | दि. २ मे २०२३ | फलटण |
सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले वारूगड व श्री क्षेत्र भैरवनाथ मंदिर वारूगड येथे कायम पर्यावरण संवर्धन व रक्षणाचा विचार रुजविणारे जिल्हा परिषद शाळा वारूगडचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, ग्रामस्थ यांच्याकडून किल्ले वारूगड व श्री क्षेत्र भैरवनाथ मंदिर वारूगड परिसराची उत्स्फूर्तपणे स्वच्छता करण्यात आली.
छत्रपती शिवरायांचे त्या काळातील पर्यावरण विषयक धोरण आदर्शवत होते. त्याच आदर्श धोरणांचा विचार समोर ठेवून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वारूगड नेहमी पर्यावरणपूरक उपक्रम राबवत असते. पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा आदर्श विचार उद्याच्या पिढीपर्यंत पोहचवून सुजाण नेतृत्व उदयाला यावे यासाठी प्रयत्नशील असते. त्याचाच भाग म्हणून वारुगड गावाचे ग्रामदैवत श्री भैरवनाथांच्या वार्षिक यात्रेनंतर अस्वच्छ झालेल्या परिसराची स्वच्छता करण्यासाठी उपक्रमशील व प्रयोगशील शाळा असणार्या मुख्याध्यापक धनंजय शिंदे सर व विद्यार्थ्यांकडून स्काऊट गाईड उपक्रमाचे जनक बेडन पॉवेल यांच्या विचाराने ‘कब बुलबुल’ उपक्रमांतर्गत या संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या व केंद्र सरकारच्या विविध उपक्रमांतर्गत विविध पातळ्यांवरती स्वच्छतेचे व पर्यावरण संवर्धनाचे काम हाती घेतले जात आहे. यात स्वच्छतेचे अग्रदूत म्हणून मलवडी येथील रयत शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य प्रभाकर खांडे सर, दहिवडी आगाराचे एस. टी. चालक सत्यवान पवार यांनीही स्वच्छता अभियानामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन पर्यावरण रक्षणासह स्वच्छतेचा जागर करत सामाजिक बांधिलकी जपली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वारूगडच्या प्रगतीत व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रयत्न करणारे, शाळा व्यवस्थापन समितीचे धडाडीचे कार्यकर्ते आणि अतिशय क्रियाशील नेतृत्व लाभलेले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अमोल खांडे, उपाध्यक्ष जनाबाई शेडगे व सर्व पदाधिकार्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या या उपक्रमात सहभाग घेतला.
श्रीनाथ माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष दाजी बुवा शिंदे, वारूगड ग्रामपंचायत सदस्य रेश्मा गोसावी, प्रभाकर खांडे, अनिल जाधव, रामभाऊ गाडे तसेच दशरथ शेडगे, बाळासो खांडे, निलम शेडगे, मेघा गोसावी, संगिता चव्हाण, पोपट फडतरे, शिवा गाडे, विलास पवार, बाळु पवार, बाबु ढेंबरे, बाळू पवार, विलास पवार, परतवडीचे उपसरपंच शंकर मोहिते, रामभाऊ गाडे यांनीही सहभाग घेतला. यावेळी पर्यावरणप्रेमी, स्वच्छतेचे अग्रदूत म्हणून परिसराची स्वच्छता करणार्या सर्व स्वच्छतादूतांना व सहभागी विद्यार्थ्यांना प्रभाकर खांडे व रामभाऊ गाडे यांनी खाऊ वाटप केले.
श्री भैरवनाथ यात्रेच्या निमित्ताने परिसराची झालेली अस्वच्छता नष्ट करून लोकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी व आपला परिसर आपणच स्वच्छ ठेवावा, आरोग्य अबाधित ठेवावे या भावनेने हा आदर्शवत उपक्रम राबविण्यात आला. किल्ले वारुगड व श्री भैरवनाथ मंदिर परिसर हे एक प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ असून सातारा जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यातून ही बरेच भाविक या ठिकाणी देवदर्शनासाठी येतात. या ऐतिहासिक गड किल्ल्यामुळे व श्री क्षेत्र भैरवनाथ यांच्या देवस्थानामुळे या गावाची, परिसराची ओळख बनली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वारूगडच्या मुख्याध्यापकांसोबत शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांनी पुढाकार घेऊन या भागाचे संपूर्ण स्वच्छता केली.