
स्थैर्य, फलटण, दि. १ नोव्हेंबर : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या ७५५ व्या जयंतीनिमित्त पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) या सुमारे ५ हजार किलोमीटर लांब पल्ल्याच्या अध्यात्मिक रथयात्रा व सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. ही वारी रविवारी (दि. २ नोव्हेंबर) फलटण शहरात पहिल्या मुक्कामासाठी येत असून, तिच्या स्वागतासाठी फलटण नगरी सज्ज झाली आहे.
भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, श्री नामदेव दरबार कमिटी व समस्त नामदेव शिंपी समाजातर्फे या वारीचे आयोजन करण्यात आले आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा व गुरुनानक देव यांच्या ५५६ व्या प्रकाश पर्वाचे औचित्यही या वारीला आहे. ३१ दिवस चालणाऱ्या या वारीत १५० सायकलस्वार व ५० भजनी मंडळी सहभागी झाली असून, ही वारी आठ राज्यांतून प्रवास करणार आहे.
रविवारी पहाटे पंढरपूर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पादुका पूजन व वारीचा शुभारंभ होईल. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार अभिजीत पाटील, आमदार समाधान अवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक उपस्थित राहतील. वेळापूर येथे आमदार उत्तमराव जानकर व सदाशिवनगर येथे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते स्वागत झाल्यानंतर, वारी नातेपुते, बरड मार्गे फलटण मुक्कामी पोहोचेल.
फलटण शहरात संत नामदेव शिंपी समाज विठ्ठल मंदिर ट्रस्ट व स्थानिक संयोजन समितीच्या वतीने स्वागताची तयारी करण्यात आली आहे. क्रांतीसिंह नाना पाटील चौक ते श्री विठ्ठल मंदिर अशी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती, खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आणि विविध संस्थांचे पदाधिकारी वारीचे स्वागत करतील.
