दैनिक स्थैर्य । दि. १५ जुलै २०२१ । मुंबई । अनेक पाणीपुरवठा योजना या क्षेत्रीय स्तरावर करण्यासारख्या आहेत. त्या तातडीने पूर्ण कराव्यात तसेच रखडलेल्या तसेच नव्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांना तसेच विभागातील नळ जोडण्यांच्या कामांना गती द्यावी असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात अमरावती व नागपूर विभागातील पाणीपुरवठा योजना, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.
नळजोडण्या व सुधारणात्मक पुनर्जोडणीचे उद्दिष्ट हवे
यावर्षी नळजोडण्या व सुधारणात्मक पुनर्जोडणी आणि नवीन योजना मोठ्या प्रमाणात पूर्ण करावयाच्या आहेत.त्या दृष्टीने सविस्तर प्रकल्प अहवाल गतीने तयार करावेत,प्रत्येक तालुक्यात दररोज,दर महिन्याला किती नळजोडण्या करणार, पुनर्जोडणी करणार याचे उद्दिष्ट ठरवून त्याप्रमाणे नियोजन करावे असे निर्देश पाणीपुरवठा मंत्र्यांनी दिले.
गडचिरोलीच्या अधिकाऱ्यांचे कौतुक
पाणीपुरवठा योजना तसेच नळजोडण्याचे उद्दिष्ट पूर्ण करीत असताना गडचिरोली जिल्ह्याने केलेल्या कामाचे कौतुक यावेळी पाणीपुरवठा मंत्र्यांनी केले व इतरांनी त्यांच्या कामांचा आदर्श घ्यावा असे सांगितले.
कालमर्यादा आखून त्याप्रमाणे काम करावे
पाणीपुरवठा योजना पूर्ण करताना तसेच नळ जोडण्यांचे उद्दिष्ट पूर्ण करताना नियोजन करून निर्धारित वेळेत उद्दिष्ट पूर्ण करावे. दर महिन्याला विभागातील मुख्य अभियंत्यांनी त्याचा आढावा घ्यावा असे निर्देशही मंत्री श्री.पाटील यांनी दिले.
बाह्य स्रोतांद्वारे मनुष्यबळ घ्यावे
काही जिल्ह्यांमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे.अशा जिल्ह्यांनी बाह्य स्रोतांद्वारे /कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे असे निर्देशही पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिले.
यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर, जलजीवन मिशनचे अभियान संचालक ऋषिकेश यशोद यांच्यासह पाणीपुरवठा व स्वच्छता तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी,अमरावती व नागपूर विभागातील पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता,अधीक्षक अभियंता आणि सर्व कार्यकारी अभियंता बैठकीला उपस्थित होते.