
स्थैर्य, फलटण, दि. 09 ऑगस्ट : माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन पंढरपूर-फलटण रेल्वेमार्गासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यासोबतच, मतदारसंघातील विविध प्रलंबित रेल्वे प्रकल्पांबाबत त्यांनी सविस्तर चर्चा करून निवेदन सादर केले.
यावेळी खासदार मोहिते-पाटील यांनी खालील प्रमुख मागण्या रेल्वेमंत्र्यांपुढे मांडल्या :
- जेऊर-आष्टी-चौंडी या नवीन प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी ठोस पावले उचलावीत.
- वारकऱ्यांच्या सोयीसाठी पंढरपूर-देहू मेमू रेल्वे सेवा तातडीने सुरू करावी.
- शेतकऱ्यांच्या शेतमाल वाहतुकीसाठी सांगोला ते दानापूर किसान रेल्वे सेवा पुन्हा सुरू करावी.
- मोडनिंब येथे ‘गतीशक्ती मल्टी-मॉडेल कार्गो टर्मिनल’ स्थापन करावे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मतदारसंघातील रेल्वे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रत्येक संसदीय अधिवेशनात सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे खासदार मोहिते-पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार बजरंग सोनावणे आणि खासदार भास्कर भगरे हे देखील उपस्थित होते.