
स्थैर्य, सातारा, दि. 7 ऑगस्ट : रक्षाबंधन सणाच्यापार्श्वभूमीवर सध्या राख्या पाठवण्यासाठी पोस्टात गर्दी होत आहे. मात्र, ऐन रक्षाबंधन सणाच्या तोंडावर टपाल खात्याची स्पीड टपाल सेवा बंद असल्याने ग्राहकांत नाराजी आहे. टपाल खात्याकडून सॉफ्टवेअरचे काम सुरू असल्याने तांत्रिक अडचणीमुळे स्पीड पोस्ट सेवा बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, राखी पाठवण्यासाठी 17 रुपयांची विशेष पाकिटे येथील मुख्य टपाल कार्यालयाकडून दिली जात असून, पाच रुपयांच्या पाकिटाची टंचाई असल्याचे सांगण्यात येत आहे.
येत्या शनिवारी (दि. 9) राखी पौर्णिमा सण होत आहे. त्यासाठी टपाल कार्यालयात परगावी असलेल्या भावांना राखी पाठवण्याची बहिणींची लगबग सुरू आहे. राखी वेळेत पोहोचावी, यासाठी अनेक जण टपाल कार्यालयातील स्पीड पोस्ट सेवाला प्राधान्य देतात. टपाल कार्यालयात राखी पाठवण्यासाठी स्पीड पोस्ट सेवेची विचारणा केल्यावर ही सेवा बंद असल्याचे सांगण्यात येते. सध्या स्पीड पोस्टसंदर्भात असणारे सॉफ्टवेअर बदलून नवे बसवण्याचे काम सुरू असल्याने सर्व ठिकाणची यंत्रणा ठप्प असल्याचे सांगण्यात येते.राखी पाठवण्यासाठी साधे पाकीटही उपलब्ध नसल्याचे मुख्य टपाल कार्यालयातून सांगण्यात येते. विचारणा केल्यावर गेल्या महिनाभरापासून त्यांची कमतरता असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे राखीसाठी असलेले बारा रुपयांचे पाकीट व त्याला पाच रुपयांचे तिकीट असे 17 रुपये पाकिटासाठी मोजावे लागत आहे. ऐन सणाच्या काळात ठप्प झालेली सेवा व पाकिटांच्या टंचाईमुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली.