स्थैर्य, दि.१४: आगामी नवरात्री, दसरा, दिवाळी आणि छठ उत्सव हंगामात रेल्वेने प्रवाशांना मोठी भेट दिली आहे. रेल्वेने 392 (196 जोड्या) अतिरिक्त विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या गाड्या 20 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या काळात मर्यादित काळासाठी धावतील. लखनौ, कोलकाता, पाटणा, वाराणसी अशा ठिकाणांहून सुरू होणाऱ्या वेगवेगळ्या भागांमधून मागणीनुसार 196 जोडी गाड्या धावण्यास रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे.
या ट्रेनमध्ये नियमित आठवड्यातून चार वेळा, आठवड्यातून एकदा चालणाऱ्या ट्रेनचा समावेश आहे. फेस्टिव्हल स्पेशल ट्रेनची घोषणा करताना रेल्वेने म्हटले की, या सर्व ट्रेन सुपरफास्ट ट्रेन असतील. यामुळे याची स्पीड कमीत कमी 55 किमी प्रति तास अशी असेल. तर या ट्रेनचे भाडे मेल/एक्सप्रेस ट्रेनच्या तुलनेत 10% ते 30% पर्यंत जास्त असेल. म्हणजे इतर स्पेशल ट्रेनच्या बरोबरीने असेल.
आतापर्यंत 550 ट्रेन धावत आहेत
रेल्वेने जोनल रेल्वेला निर्देश दिले आहेत की, या ट्रेनमध्ये एसी-3 कोचची संख्या जास्त असणार आहे. अनलॉक नंतर 12 मेपासून आतापर्यंत रेल्वे देशभरात जवळपास 550 मेल/एक्सप्रेस विशेष ट्रेन चालवल्या जात आहेत. यामध्ये 15 जोडी राजधानी विशेष ट्रेन, 100 जोडी लांब अंतराच्या ट्रेनचा समावेश आहे.
फेस्टिव्ह स्पेशल ट्रेन मिळून लॉकडाउनच्या पूर्वीच्या तुलनेत केवळ 8.6% ट्रेन धावणार
लॉकडाउनपूर्वीपर्यंत लोकल, मेल, एक्सप्रेस, शताब्दी, राजधानी, दूरंतो मिळून 11 हजारांपेक्षा जास्त ट्रेनचे संचालन होत होते. म्हणजेच आता सणांच्या विशेष ट्रेन मिळून सामान्य दिवसांमध्ये संचालित होणाऱ्या ट्रेनच्या तुलनेत केवळ 8.6% ट्रेन संचालित होतील. नुकतेच रेल्वे बोर्डाचे चेअरमन विनोद कुमार यादव यांनी म्हटले होते की, रेल्वे फेस्टिव्ह सीजनमध्ये 200 पेक्षा अधिक ट्रेन चालवण्याची योजना बनवली आहे. गरजेनुसार याची संख्या वाढवण्यात येईल.
5 जोडी विशेष ट्रेन भोपाळ आणि इटारसीमध्ये थांबतात
सण-उत्सवांमध्ये सुरू होत असलेल्या 392 विशेष ट्रेनमध्ये पाच जोडी ट्रेन भोपाळ आणि इटारसी स्टेशनवर थांबतात. यामध्ये समता, स्वर्ण जयंती आणि जयपुर-हैदराबाद स्पेशल भोपाळ स्टेशनवर थांबतील. तर काशी आणि कामाख्या स्पेशल या इटारसी स्टेशनवर थांबतील.