दैनिक स्थैर्य । दि. २७ जुलै २०२२ । मुंबई । आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या मंदिरात महापूजा करण्याचा मान मला मिळाला, हे माझं भाग्य समजतो. मोठ्या देवस्थानाच्या ठिकाणी भाविकांसाठी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा असतात. चांगले रस्ते, पिण्याचं मुबलक पाणी, शौचालये असतात. त्याच प्रकारच्या सोयी सुविधा पंढरपुरात निर्माण करणार आहे. त्यासाठी विशेष आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आजपर्यंत जे झालं नाही ते पंढरपूरसाठी करणार असून पंढरपूरचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. महाराष्ट्रातील प्रमुख कीर्तनकारांनी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन सत्कार केला त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ गायनाचार्य ह भ प हरिभाऊ रिंगे महाराज यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानपत्र रिंगे महाराजांना प्रदान करण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे पुढे असेही म्हणाले की, केवळ हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कायम रहावेत यासाठी आम्ही शिवसेना खासदार-आमदारांनी वेगळी वाट निवडली आहे. आम्ही ही एक विचारांची लढाई लढतोय, बाळासाहेबांच्या तेजस्वी हिंदुत्वाच्या विचारांची ही लढाई आहे. हे हिदुत्व म्हणजे दुसऱ्या समाजाचा द्वेष नव्हे. हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार होत असताना त्याचा इतर धर्मावर परिणाम होणार नाही हीच भूमिका आमची कायम राहणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले. सर्वसामान्य लोकांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नसल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. याप्रसंगी अंबरनाथचे आमदार डॉ बालाजी किणीकर, विश्वनाथ महाराज वारिंगे, पुरुषोत्तम महाराज उगले, मराठी संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, अंबरनाथचे नगरसेवक सुभाष साळुंखे, नगराध्यक्ष चौधरी, आळंदीचे रविदास महाराज शिरसाट, संत मुक्ताबाई संस्थांनचे तुकाराम महाराज मेहुणकर, पैठणचे ज्ञानेश्वर महाराज इंगळे, ह भ प चंद्रभान सांगळे महाराज, मनोजकुमार गायकवाड सिन्नरचे किशोर महाराज खरात, बदलापूरचे रवींद्र महाराज मांडे आदी पारमार्थिक क्षेत्रातील शेकडो वारकरी मंडळी उपस्थित होती.