स्थैर्य, सातारा, दि. २१ : सातारा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी मंगळवारी सातारला भेट दिली. यावेळी त्यांनी पोलिसांच्या आरोग्याची माहिती घेऊन राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. सातारा येथे वारके आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्ह्यात करोना झालेल्या पोलिसांची माहिती घेऊन वारके आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. आतापर्यंत जिल्ह्यातील 21 पोलिसांना करोना बाधा झाली असून त्यातील एकाला पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे.
सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या लॉकडाउनच्या बाबतही बंदोबस्ताची माहिती त्यांनी घेऊन जिल्हावासीयांना खबरदारी घ्यावी तसेच आरोग्य विभाग आणि पोलीस दल सर्वांची काळजी घेत आहे. पोलिसांना आपण सहकार्य करा असे आवाहनही यावेळी वारके यांनी केले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील उपस्थित होते.