दैनिक स्थैर्य । दि. ०८ जुलै २०२२ । सातारा । नवीन शैक्षणिक वर्ष सन 2022-23 नुकतेच सुरु झाले आहे. या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा यांचेमार्फत विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये योग्यता प्रमाणपत्र, स्कुलबस परवाना तसेच इतर सर्व वैध कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांना विद्यार्थी वाहतूकीस परवानगी देण्यात येणार नाही याची वाहतूकदार, शिक्षण संस्था, व्यवस्थापन व पालकांनी नोंद घ्यावी असे सहाय्यक प्रादेशिका परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र शासनाने दि. 22.3.2011 रोजी अधिसूचना जारी केली असून त्यानुसार स्कूल बस संदर्भातील नियमावली लागू केली आहे. नागपूर उच्च न्यायालयात जनहित याचिका क्र. 2/2012 या सुनावणीच्यावेळी या संदर्भात मा. न्यायालयाने शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तपासणी करण्याचे सुचित केले आहे.