स्थैर्य, फलटण, दि. 28 : कोव्हिड 19 मुळे परप्रांतातील अडकलेल्या मजुरांना आपापल्या गावी सोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एक योजना राबवली होती. त्यानुसार सातारा आगारा मार्फत पश्चिम बंगाल येथे मजुरांना सुरक्षित सोडण्यात आले. या एसटी बसचे चालक एस. टी. जगताप व एस.एस. निंबाळकर यांच्या सुरक्षित कामगिरीबद्दल संगिनी फोरम ग्रुप, फलटण तर्फे अभिनंदन पत्र त्यांना दिले आहे. ते पत्र आज दोन्ही चालकांना फलटण आगारात आगार व्यवस्थापक राहुल कुंभार, संगिनी फोरमचे कॉर्डिनेटर राजेंद्र कोठारी, तसेच फलटण तालुका दैनिक व साप्ताहिक संपादक संघाचे अध्यक्ष विशाल शहा यांच्या शुभहस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.
यावेळी श्रीफळ व मोत्यांची माळ घालून दोन्ही चालकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी स्थानक प्रमुख राजेंद्र वाडेकर, वाहतूक निरीक्षक दत्तात्रय महानवर, सहाय्यक वाहतूक निरीक्षक धीरज अहिवळे, वरिष्ट लिपीक पंकज वाघमारे, श्रीपाल जैन उपस्थित होते. यावेळी जगताप व निंबाळकर या चालकांनी सत्कारा बद्दल धन्यवाद देऊन आपल्या पश्चिंम बंगाल कामगिरीचे उत्कृष्ट वर्णन केले व आम्ही या प्रवाशांची चांगली सेवा करू शकलो याबद्दल समाधान व्यक्त केले.