दैनिक स्थैर्य । दि. १८ मार्च २०२२ । मुंबई । जागतिक जलदिनानिमित्त महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिनांक २२ मार्च २०२२ रोजी विशेष प्रदर्शन आयोजित केले आहे.
जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड, कुलाबा, मुंबई येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल, अशी माहिती प्राधिकरणाचे सचिव रामनाथ सोनवणे यांनी दिली आहे.
भूजल व भूपृष्ठावरील उपलब्ध पिण्यायोग्य पाण्याचा काटकसरीने वापर करणे, पाण्याची बचत करणे आणि भूजल पाण्याच्या पातळीत वाढ होण्यासाठी पर्जन्य जलसंचयासारखे उपक्रम राबवणे यासाठी मोठ्या प्रमाणावर समाज प्रबोधन व जनजागृती करणे आवश्यक आहे. या हेतूने हे प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे. प्रदर्शनास जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देऊन पाणी बचतीसाठी वैयक्तिक व सामूहिकरित्या योगदान द्यावे, असे आवाहन जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे सदस्य श्री. संजय कुलकर्णी (जसं), श्रीमती श्वेताली ठाकरे (अर्थ) आणि श्रीमती साधना महाशब्दे (विधी) यांनी केले आहे.