राज्यातील १४ शासकीय पॉलिटेक्निकमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विशेष तुकडी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ जुलै २०२२ । मुंबई । राज्यातील 14 शासकीय पॉलिटेक्निकमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विशेष तुकडी सुरु असून विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन अल्पसंख्याक विकास विभागामार्फत करण्यात आले आहे. या पॉलिटेक्निकमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याकरिता ७ जुलै 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

हिंगोली, जालना, अंबड (जि. जालना), लातूर, नांदेड, वांद्रे (मुंबई), रत्नागिरी, ठाणे, ब्रम्हपुरी (चंद्रपूर), जळगाव, पुणे, कराड (जि. सातारा) आणि सोलापूर येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये (पॉलिटेक्निक) तसेच शासकीय मुद्रण तंत्रज्ञान संस्था (मुंबई) येथे अल्पसंख्याकांसाठी विशेष तुकडी सुरु असून त्यासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.

विशेष तुकड्यांमध्ये अल्पसंख्याकांसाठी 1 हजार 155 जागा उपलब्ध असून याशिवाय अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना नियमित तंत्रनिकेतनमध्येही प्रवेशाचा हक्क आहे. विशेष तुकड्यांमध्ये मुलींसाठी 30 टक्के जागा राखीव आहेत. मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, प्रिंटींग टेक्नॉलॉजी अशा विविध कोर्सेसचे प्रशिक्षण उपलब्ध आहे. विशेष तुकड्यांमध्ये अल्पसंख्याक समुहातील विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ३० टक्के जागा उपलब्ध आहेत.

विद्यार्थ्यांना वार्षिक 7 हजार 750 रुपये इतक्या अत्यल्प शुल्कामध्ये प्रवेशाची संधी आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचीही संधी मिळणार असून केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीसाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा 2 लाख रुपयांपर्यंत तर राज्य शासनाच्या शिष्यवृत्तीसाठी 8 लाख रूपयांपर्यंत आहे. अर्ज भरण्याचे शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 400 रुपये तर मागासवर्गीयांसाठी 300 रुपये इतके आहे. प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी कालावधी ७ जुलै 2022 पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी संकेतस्थळ https://poly22.dte.maharashtra.gov.in तसेच ०२२- ६८५९७४३०, 8698781669, 8698742360 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!