दैनिक स्थैर्य । दि.२२ मार्च २०२२ । मुंबई । ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत उल्हासनगर येथे दिनांक 29 नोव्हेंबर 2021 रोजी एका नायजेरीयन व्यक्तीकडून अंमली पदार्थासह 1 लाख 20 हजार रूपयांचा माल जप्त करण्यात आला असून त्या व्यक्तीला अटक करून त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मुंबई व उपनगरात अंमली पदार्थ सेवन व विक्री यास प्रतिबंध बसला पाहिजे यासाठी अधिवेशन संपण्यापूर्वी सर्व पोलीस उपायुक्तांना एक विशेष मोहीम हाती घेण्याबाबत सूचना देण्यात येतील, अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थाचे सेवन व विक्री आढळून येईल त्या ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात येणार असून विशेषत: शाळा व कॉलेज परिसरात पेट्रोलिंग करून ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. पोलीस उपायुक्तांसमवेत होणाऱ्या बैठकीत मुंबई आणि उपनगरात जो निर्णय घेण्यात येईल तोच निर्णय राज्यालाही लागू करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री श्री.देसाई यांनी यावेळी सांगितले.
यासंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य सर्वश्री रविंद्र फाटक, प्रविण दरेकर, ॲड निरंजन डावखरे, प्रविण दटके यांनी उपस्थित केला होता.