दैनिक स्थैर्य । दि. २३ सप्टेंबर २०२१ । सातारा । आधारव्दारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी आधारला मोबाईल लिंक करण्यासाठी सातारा डाक विभागाच्यावतीने दि. 27 ते 30 सप्टेंबर या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाच्या सवलती योजनेसाठी आधार लिंक गरजेचा असून या मोहिमेत जिल्हयातील १ लाख नागरिकांचे आधार लिंक करण्याचे उद्दिष्ट सातारा डाक विभागाने ठेवले आहे. जिल्हावासियांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सातारा डाक विभागाच्या प्रवर अधिक्षक अपराजिता म्रिधा यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी वरिष्ठ शाखा अधिकारी संतोषकुमार सिंह, तक्रार निरीक्षक सचिन कामटे, सहाय्यक अधिकारी सातारा पश्चिम विभाग दिलीप सर्जेराव उपस्थित होते.
म्रिधा पुढे म्हणाल्या, इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत नागरिकांना बँकिंग सेवा दिली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पोस्टमनच्या माध्यमातून जिल्ह्यातील ७०० हुन अधिक पोस्ट कार्यालयातून युआयडीएआय आधारला मोबाईल लिंकींग सेवा देण्यात येणार आहे. आधारला मोबाईल लिंक केल्यास आधारशी लिंक असलेल्या इतर माहितीचा दुरुपयोग इतर कोणी करु शकणार नाही. तसे झाल्यास लिंक असलेल्या मोबाईलवर लगेच मेसेज जातो. त्यामुळे फसवणुकीच्या घटनांना आळा बसणार आहे. त्याचबरोबर पॅन, पासपोर्ट व वाहन परवाना काढण्यासाठी तसेच विद्यार्थी शिष्यवृत्ती, रिक्षाचालक अनुदान यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारला मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी सातारा डाक विभागाने आधारला मोबाईल लिंकींगची मोहिम सुरु केली आहे. पोस्टमनव्दारे नागरिकांना घरपोच आधार अपडेट, मोबाईल लिंक करता येणार आहे. मोठ्या हौसिंग सोसायटीचे रहिवाशी, विविध कार्यालयातील कर्मचारी एकत्रितपणेही जवळच्या पोस्टातील कर्मचार्यांना बोलावून आधारला मोबाईल लिंक करु शकणार आहेत. या मोहिमेत जिल्हयातील १ लाख नागरिकांचे आधार लिंक करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्याजवळच्या पोस्ट कार्यालयाशी संपर्क साधून जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.