या मोहिमे अंतर्गत सातारा विभागातील प्रत्येक पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट होणाऱ्या प्रत्येक राखी पाकिटावर देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव : “देशाचे रक्षण करणाऱ्या माझ्या धाडसी भावासाठी” असे लिहून प्रेषक म्हणून स्वतःचा पत्ता लिहावा व सदर राखी पाकीट संबधित पोस्ट ऑफिसच्या पोस्टमास्तर कडे जमा करावे. अशाप्रकारे सर्व पोस्ट ऑफिस मध्ये जमा झालेली पाकिटे ५ ऑगस्ट २०२२ पर्यंत डिव्हिजनच्या हेड पोस्टऑफिस मध्ये जमा केली जातील व त्याची एक स्वत्रंत्र बॅग बांधून ती बॅग कमांडिंग ऑफिसर यांच्या नावे हेड पोस्टमास्टर यांच्या पत्रासह सैनिकांसाठी दिलेल्या पत्यावर पाठवण्यात येईल. तरी सातारा जिल्हयातील जनतेला आवाहन करण्यात येते कि, देशाची अहोरात्र सेवा करणाऱ्या सैनिकांसाठी भारतीय टपाल विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे व सैनिकांना राख्या पाठविण्यासाठी सुरु केलेल्या वरील व्यवस्थेचा लाभ घ्यावा. वरील बाबतीत काही अडचण असल्यास पोस्ट ऑफिस मधील कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी.
दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑगस्ट २०२२ । सातारा । भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष होत आहेत. या ७५ वर्षामध्ये घरापासून शेकडो मैल दूर राहून देशासाठी आपल्या प्राणांची बाजी लावून लढणारे अनेक सैनिक हे आपले रक्षणकर्ते बांधव आहेत. देशाची सुरक्षा करण्याचे एकमेव ध्येय त्यांच्यासमोर असते. घरापासून दूर असल्याने त्यांना देशात घरोघरी साजरे होणारे कोणतेही सण साजरे करता येत नाहीत. म्हणून सैनिकांच्या कार्याची दखल घेताना, भारतीय टपाल विभागाच्या सातारा विभागाने, 11 ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाच्या रक्षाबंधनानिमित्त, टपाल विभागाने तयार केलेल्या राखी पाकिटातून राखी पाठवून सैनिकांचा रक्षाबंधनाचा आनंद द्विगुणीत करण्याचे आवाहन सातारा टपाल विभागामार्फत करण्यात येत आहे. सैनिकांसाठी पाठवण्याची राखी-पाकिटे जमा करण्यासाठी आणि ती वेळेत पोहोच करण्यासाठी वेगळी व्यवस्था सातारा विभागातील सर्व पोस्ट ऑफिस मार्फत करण्यात आलेली आहे.