दैनिक स्थैर्य | दि. 04 डिसेंबर 2023 | सातारा | जिल्ह्यातील सातारा लोकसभा मतदारसंघ आणि फलटण तसेच वाई विधानसभा निवडणुकीबाबतचा प्रश्न केल्यावर शरद पवार यांनी साताऱ्यातील सभेत पावसात भिजलो. त्यानंतर लोकं काय करतात ते सर्वांनी पाहिलंय. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत सातारा लोकसभेसह फलटण व वाई विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार आणि निवडूण आणणार, असे ठामपणे खासदार शरद पवार यांनी स्पष्ट केले.
खासदार शरद पवार हे रविवारी सातारा दाैऱ्यावर आले होते. या दौऱ्यात शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील आदी उपस्थित होते.
‘दुसऱ्याच्या ताटातील काढून कोणाला देऊ नये ही भूमिका सर्वपक्षीय बैठकीत घेतली आहे. त्यामुळे मराठा समाज आरक्षणासाठी दुसरेही पर्याय आहेत. तसेच, संपूर्ण देशात जातनिहाय जनगणना व्हावी, तरच वस्तूस्थिती समोर येईल,’ अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केली. तसेच, जिल्ह्यातील निवडणुकीबाबत त्यांनी उमेदवार देणार आणि निवडूण आणणारच, असा इरादाही खासदार पवार यांनी बोलून दाखविला.
शरद पवार म्हणाले, ‘देशातील चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. यामध्ये वेगळा काही निकाल लागेल अशी माहिती आम्हाला नव्हती. कारण, दोन राज्यांत भाजपची सत्ता नव्हती. त्याठिकाणी भाजपने लक्ष केंद्रित केले होते. तेलंगणात सत्ताधारीच पुन्हा सत्तेत येतील असे एक चित्र दिसून येत होते. पण, राहुल गांधी यांची हैदराबाद येथे सभा झाली. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर तेथील चित्र बदलले.’
काॅंग्रेसने चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीबद्दल ईव्हीएमवर शंका उपस्थित केल्याचा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर पवार यांनी मी ईव्हीएम यंत्राला दोष देणार नाही. माझ्याकडे अधिकृत काही माहिती नाही. त्यामुळे त्यावर भाष्य करणे बरोबर नाही. तरीही मंगळवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक होत आहे. त्यामध्ये सर्व विषयांवर चर्चा होईल, असे स्पष्ट केले. तसेच मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याच्या प्रश्नावर त्यांनी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली होती. त्यावेळी आम्ही दुसऱ्याच्या ताटातील काढून घेऊ नये ही भूमिका घेतलेली. केंद्र शासनानेही याबाबत निर्णय घेण्याचा ठराव घ्यावा, अशी सूचनाही पवार यांनी केली.
खासदार शरद पवार यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यामध्ये महायुतीत लोकसभा मतदारसंघ जागावाटपावर चर्चा झाली असून आघाडीची भूमिका कुठपर्यंत आली आहे, असा प्रश्न केल्यावर पवार यांनी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र बसून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असे स्पष्ट केले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काैतुक केले असल्याच्या प्रश्नावर त्यांची भाजपशी जवळीक आहे. त्यामुळे ते त्या पक्षाला साजेसेच बोलणार ना ? असे सांगत पवार यांनी अधिक बोलणे टाळले.