
दैनिक स्थैर्य । 3 एप्रिल 2025। फलटण । येथील सिंधी बांधवांसाठी शहरात श्री झुलेलाल सामाजिक सभागृहसाठी फलटण शहरात जागा मिळावी व सभागृह बांधून मिळावे अशी मागणी, सकल हिंदू समाज कृती समितीच्यावतीने मुख्याधिकार्यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, हिंदू सिंधी समाजातील बांधव फलटण शहरात गेली 75 वर्षाहून अधिक काळ वास्तव्यास आहेत. सिंधी समाजाच्या कुलदेव श्री झुलेलाल आहेत. त्यांना नित्य नेमाने सामाजिक व धार्मिक कार्य व पूजा अर्चा करण्यासाठी सभागृह बांधून मिळावे.
भगवान झुलेलाल हे वरुण देवतेचे अवतार होते, अशी श्रद्धा आहे. भारतीय संस्कृती आणि इतिहासात भगवान श्री झुलेलाल यांचे खुप महत्व आहे. सभागृह नसल्यामुळे सिंधी समाजातील मुलांना लग्नाच्या संदर्भात अडचणी निर्माण होत आहेत, तसेच सामाजिक व धार्मिक विधीसाठी शहराबाहेर जावे लागते. सभागृह नसल्यामुळे हिदू- सिंधी समाजाचे ब्राह्मण येथे वास्तव्यास नाहीत. समाजिक व धार्मिक विधीसाठी त्यांना प्रत्येक वेळी बाहेरून बोलवावे लागते. त्याच बरोबर सभागृह झाल्यास शैक्षणिक कार्य तसेच ग्रंथालय ई. विधायक उपक्रम सुरू होऊ होतील. या मागणीचा गांभीर्याने विचार करावा असेही निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर अॅड. प्रशांत निंबाळकर, संदीपकुमार माळी, गणेश दप्परामाळी यांच्या सह्या आहेत. निवेदनाच्याप्रती राज्यपाल, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.