स्थैर्य, हैदराबाद, दि.९: दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. आंध्र प्रदेशच्या गुंटूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने जयप्रकाश रेड्डी यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले.
तेलुगु सिनेमाचे प्रेक्षक जयप्रकाश रेड्डी यांना कॉमेडी एक्टर म्हणून ओळखत असे. त्यांनी ब्रम्हपुत्रुदू या सिनेमापासून आपलं करिअर सुरु केले होते. जयप्रकाश रेड्डी यांच्या निधनानं टॉलिवूड सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनीही त्यांच्या निधनाने शोक व्यक्त केला आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी जयप्रकाश रेड्डी यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
जयप्रकाश रेड्डी यांना बाथरुममध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. रेड्डी हे कुर्नूलच्या अल्लागड्डा येथील आहेत. १९८० पासून त्यांनी अनेक सिनेमात काम केले होते. अलीकडे साऊथचे सिनेमे हिंदीमध्ये डब करुन दाखवले जातात. यात जयप्रकाश रेड्डी यांची भूमिका हमखास प्रेक्षकांना पाहायला मिळत असते.