दैनिक स्थैर्य । दि.२५ जानेवारी २०२२ । सातारा । महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांनी पाणीबिल थकवल्याने त्यांच्या बिलावर विलंब आकार, दंडव्याज लावण्यात आले होते. दरम्यान, अन्यायकारक विलंब आकार माफ करण्याबाबत आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून विलंब आकार माफ करण्याची मागणी केली होती. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीला मोठे यश मिळाले असून ना. पाटील यांनी विलंब आकार माफ करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला असून थकबाकीदार ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे मेटाकुटीस आलेल्या जनतेला अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लॉकडाऊन, महागाई आणि कामधंदा बंद असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या असंख्य ग्राहकांना वेळेत पाणीबिल भरण्यास शक्य झाले नाही. त्यातच प्राधिकरणाने थकीत बिलावर विलंब आकार लावल्याने ग्राहकांच्या अडचणीत वाढ झाली होती. याबाबत सातारा शहर आणि परिसरातील ग्राहकांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेऊन विलंब आकार माफ करून मिळावा अशी मागणी त्यांच्याकडे केली होती. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यासंदर्भात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना लेखी निवेदन देऊन आणि समक्ष चर्चा करून ग्राहकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड बसू नये यासाठी विलंब आकार माफी करावी, अशी मागणी केली होती.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून ना. पाटील यांनी केवळ सातारचे नव्हे तर संपूर्ण राज्यातील प्राधिकरणाच्या ग्राहकांसाठी अभय योजना लागू करून त्याद्वारे पाणीबिलावरील विलंब आकार, दंडव्याज माफ करण्याचा मोठा निर्णय नुकताच जाहीर केला. यामुळे प्राधिकरणाच्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून याचा लाभ लष्कर पाणीपुरवठा केंदांतर्गत येणाऱ्या सदरबझार, शाहूनगर, विसावा नाकामी, गोडोली, शाहूपुरी, खिंडवाडी, खेड, पिरवाडी आदी भागातील तसेच पाचगणी आणि महाबळेश्वर येथील ग्राहकांनाही होणार आहे.