
स्थैर्य, फलटण, दि. 24 ऑक्टोबर : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचे पडघम वाजू लागताच वाठार निंबाळकर गटातून आणखी एक नाव उमेदवारीसाठी चर्चेत आले आहे. उपळवे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सोपानराव जाधव यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी संधी दिल्यास वाठार निंबाळकर जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
सोपानराव जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारण आणि समाजकारणात सक्रिय आहेत. उपळवे गावचे सरपंच म्हणून त्यांनी काम पाहिले असून, परिसरातील नागरिकांशी त्यांचा चांगला संपर्क आहे. त्यांनी आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मतदारसंघाची सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे.
पक्षाने, विशेषतः माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्यावर विश्वास दाखवून उमेदवारी दिल्यास, आपण ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवण्यास सज्ज असल्याचे सोपानराव जाधव यांनी म्हटले आहे. त्यांच्या या घोषणेमुळे वाठार निंबाळकर गटातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
यापूर्वीही याच गटातून विजयकुमार लोखंडे यांनी राजे गटाकडे उमेदवारीची इच्छा व्यक्त केली होती. आता सोपानराव जाधव यांनी भाजपमधून उमेदवारी मागितल्याने, या गटातील लढत अधिक चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही प्रमुख पक्षांकडून उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढत असल्याने, पक्षश्रेष्ठी कोणाला संधी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

