तालुकास्तरीय धावणे स्पर्धेत सोनवडी खुर्दच्या दिगंबर सूर्यवंशीचा दबदबा; पटकावला प्रथम क्रमांक

मुधोजी महाविद्यालय मैदानावर झालेल्या स्पर्धेत १८ वर्षांखालील गटात मिळवले यश; सरपंच, उपसरपंचांसह मान्यवरांकडून अभिनंदन


स्थैर्य, फलटण, दि. २५ ऑगस्ट : मुधोजी महाविद्यालय मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय धावण्याच्या स्पर्धेत सोनवडी खुर्द (ता. फलटण) येथील कुमार दिगंबर शरद सूर्यवंशी याने १८ वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक पटकावून उज्ज्वल यश संपादन केले आहे. त्याच्या या कामगिरीमुळे सोनवडी खुर्द गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, गावातील सर्व स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे.

दिगंबर सूर्यवंशी याने सुरुवातीपासूनच स्पर्धेत आपले वर्चस्व कायम राखत अंतिम फेरीत विजय मिळवला. त्याच्या या यशाबद्दल गावच्या सरपंच शालिनीताई सूर्यवंशी, उपसरपंच दत्तात्रय चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सचिन सूर्यवंशी तसेच युवा नेते अक्षय सोनवलकर, रामहरी सोनवलकर आणि संजय मोरे यांनी त्याचे अभिनंदन केले.

सर्व मान्यवरांनी दिगंबरला पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि त्याच्या यशाने गावातील इतर तरुणांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.


Back to top button
Don`t copy text!