सोनूच्या शिरपेचात मानाचा तुरा : युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या मानवतावादी कृती पुरस्काराने सोनू सूद सन्मानित; एंजेलिना जोली, डेव्हिड बेकहॅमचा या पुरस्काराने झाला आहे गौरव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दि.३०: हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड, पंजाबी अशा विविध भाषांतील चित्रपटांमध्ये काम करणारा सोनू सूद एक यशस्वी अभिनेता आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या चित्रपटांमुळे नाही तर त्याच्या मदतकार्यामुळे चर्चेत आहे. कोरोना काळात सोनू सूद गरजूंसाठी देवदूत ठरला. त्याने विविध माध्यमातून गरजुंना मदत केली.

या कार्याबद्दल सोनू सूदला युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (UNDP) कडून प्रतिष्ठित एसडीजी विशेष मानवतावादी कृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सोमवारी (29 सप्टेंबर 2020) संध्याकाळी व्हर्ज्युअल कार्यक्रमात हा पुरस्कार सोनूला प्रदान करण्यात आला. यापूर्वी या पुरस्काराने एंजेलिना जोली, डेव्हिड बेकहॅम, लिओनार्डो डिकॅप्रियो, एम्मा वॉटसन, लियाम नीसन, केट ब्लँशेट, अँटोनियो बांदरेस, निकोल किडमॅन आणि प्रियांका चोप्रा या सेलिब्रिटींना संयुक्त राष्ट्रांच्या विविध संघटनांनी सन्मानित केले आहे.

‘हा एक दुर्मिळ सन्मान आहे. युनायटेड नेशन्सची ओळख खूप खास आहे. मी सर्व काही माझ्या देशवासीयांकडून कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा न ठेवता केले,’ असे पुरस्कार प्राप्त केल्यानंतर सोनू सूद म्हणाला. 

सोनूचे मदकार्य… 

कोरोनाच्या काळात देशभर लॉकडाऊन लागू झाला आणि मग स्थलांतरित मजूर आपापल्या गावी परतण्यासाठी धडपडू लागले. या मजुरांना घरी पोहोचवण्याची सोय सोनूने केली. प्रवासी मजुरांना नवीन काम मिळावे याकरिता ‘प्रवासी रोजगार’ अ‍ॅप लाँच केले. देशातील अनेक विमानतळं बंद असतानाही सोनूने कोची आणि भुवनेश्वरमधील विमानतळे उघडण्याची परवानगी काढली आणि एअर एशिया विमानाने केरळच्या महिलांना त्यांच्या घरी पोहोचवले. फक्त स्थलांतरित मजूरच नव्हे तर सोनू आणि त्याच्या टीमने निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटुंबालाही मदत केली. किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या 28000 लोकांना निवासाची जागा आणि खाण्या-पिण्याचे पदार्थ पुरवले. विविध माध्यमातून त्याचे मदतकार्य आजही सुरु आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!