स्थैर्य, मुंबई, दि.१२: प्रवासी मजुरांसाठी रोजगार अॅप आणि या अॅपच्या माध्यमातून त्यांना घराची ऑफर दिल्यानंतर आता अभिनेता सोनू सूदने गरजू मुलांच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप सुरू केली आहे. कोरोनाच्या या परिस्थितीत सोनू सूदने अनेक गरजू मुलांना शिक्षणात मदत केलीच आहे, पण आता त्याने आणखी एक पाऊल पुढे टाकत स्कॉलरशिप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्याने एक ईमेल अॅड्रेसदेखील शेअर केला आहे.
गरीब आणि गरजू मुलं, ज्यांना पैशांअभावी शिक्षण पूर्ण करता येत नाही अशा मुलांसाठी सोनूने स्कॉलरशिप सुरू केली आहे. त्याने आपल्या सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. याबाबत त्याने एक ट्विट केले आहे.
या स्कॉलरशिपविषयी माहिती देताना सोनून लिहिले, “जेव्हा सर्व शिकतील, तेव्हाच हिंदुस्तान पुढे जाईल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फुल स्कॉलरशिप लाँच करत आहे. आर्थिक आव्हानं कोणत्याही लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी रोखू शकत नाहीत असा विश्वास मला आहे. पुढील दहा दिवसांत तुम्ही [email protected] यावर एंट्री करा आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचेन”, असे ट्विट सोनूने केले आहे.
सोनू पुढे म्हणाला, “आपले भविष्य आपली क्षमता आणि मेहनत ठरवेल. आपण कुठून आलो आहोत, आपली आर्थिक स्थिती काय आहे याचा काहीही संबंध नाही. हा माझा एक प्रयत्न आहे. शाळा संपल्यानंतर पुढील शिक्षणासाठी पूर्ण स्कॉलरशिप. जेणेकरून तुम्ही पुढे जाल आणि देशाच्या प्रगतीत योगदान द्याल. [email protected] यावर ई-मेल करा”
या विषयांसाठी मिळणार स्कॉलरशिप
या पोस्टरमध्ये मॅनेजमेंट, वैद्यकीय, कायदे आणि शेतीविषयक अशा सर्व कोर्सेचा समावेश असल्याचं दिसतं आहे. ज्या कुणाला आपले शाळेनंतरचं शिक्षण पूर्ण करायचे आहे, त्यांच्यासाठी आता आर्थिक अडचण राहणार नाही. कारण त्यांना सोनू सूदने मदतीचा हात दिला आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न दोन लाखांहून कमी आहे, ते या स्कॉलरशिपसाठी अर्ज करु शकतात. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चापासून ते त्यांच्या हॉस्टेल फी आणि खाण्या-पिण्याचा खर्च सोनू उचलणार आहे.