सहा मजली निवासी इमारतीचे हॉटेलमध्ये रुपांतर केल्याचा सोनू सूदवर आरोप, BMC ने पोलिसांत दाखल केली तक्रार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.७: लॉकडाऊनच्या काळात गरजू लोकांसाठी देवदूत ठरलेला अभिनेता सोनू सूद आता वादात अडकला आहे. अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुंबई महापालिकेने सोनू सूद विरोधात जुहू पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. जुहू येथील एबी नायर रोडवरील शक्ती सागर इमारतीचे आवश्यक त्या परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

पालिकेने सोनू सूद विरोधात 4 जानेवारील तक्रार दाखल केली आहे. बीएमसीने दिलेल्या तक्रारीत म्हटले, “सोनू सूदने स्वत: जमिनीच्या वापरावर बदल केला आहे. त्याशिवाय निश्चित प्लानमध्ये अतिरिक्त निर्माण करुन रहिवासी इमारतीला हॉटेलच्या इमारतीत रुपांतरीत केले. यासाठी त्यांनी अथॉरिटीकडून आवश्यक ती परवानगी घेतलेली नाही.”

पालिकेच्या नोटिसकडे सोनूने दुर्लक्ष केल्याचा आरोप
बीएमसीने सोनू सूदवर नोटिसकडे दुर्लक्ष केल्याचाही आरोप केला आहे. सिविक अथॉरिटीने सांगितले, नोटिस दिल्यावरही तो अनधिकृत निर्माण करत राहिला. त्याने महाराष्ट्र प्रदेश आणि नगररचना (एमआरटीपी) कायदा कलम 7 अंतर्गत गुन्हा केला आहे.

काय म्हणाला सोनू सूद?
याप्रकरणी सोनू सूदने दिलेल्या माहितीनुसार, त्याने आधीच बीएमसीकडून युझर चेंजसाठी परवानगी घेतलेली आहे आणि सध्या तो महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून परवानगी मिळण्याची प्रतिक्षा करत आहेत.

पालिकेच्या नोटिसविरोधात न्यायालयात गेला होता सोनू
बीएमसीने जारी केलेल्या नोटिसविरोधात सोनू सूदने मुंबईच्या सिव्हिल न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण, त्याला अंतरिम दिलासा मिळाला नाही. न्यायालयाने सोनू सूदला उच्च न्यायालायत याचिका करण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी दिला होता. बीएमसीच्या मते न्यायालयाने दिलेला तीन आठवड्यांचा कालावधी संपला आहे.

आता पुढे काय होणार?
बीएमसीच्या तक्रारीनंतर आता पोलिस पुढील तपास करतील. सोनू सूदने अनधिकृत बांधकाम केल्याचे आढळल्यास पोलिस महाराष्ट्र प्रदेश आणि नगररचना कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करू शकतात.


Back to top button
Don`t copy text!