
फलटण कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे महिलांना मार्गदर्शन. दुग्धप्रक्रियेतून महिला सक्षमीकरणाचा प्रयत्न. ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
स्थैर्य, फलटण, दि. २५ डिसेंबर : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न आणि फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय, फलटणच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सोनवडी खुर्द (ता. फलटण) येथे महिलांसाठी उपयुक्त असा उपक्रम राबवला. ‘ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२५-२६’ (RAWE) अंतर्गत कृषीदुतांनी गावातील महिलांना दुधापासून व्यावसायिक दर्जाची बासुंदी बनवण्याचे प्रशिक्षण दिले.
दुधाचे मूल्यवर्धन करून त्यापासून विविध पदार्थ बनवल्यास अधिक नफा मिळू शकतो, ही बाब कृषीदुतांनी महिलांच्या निदर्शनास आणून दिली. या प्रशिक्षणात त्यांनी बासुंदी बनवण्याची शास्त्रशुद्ध पद्धत प्रात्यक्षिकाद्वारे (Demonstration) करून दाखवली. तसेच, इतर दुग्धजन्य पदार्थांच्या तुलनेत बासुंदी जास्त काळ कशी टिकवून ठेवता येते आणि तिचे आरोग्यासाठीचे फायदे काय आहेत, याचे महत्त्वही पटवून दिले.
प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तयार झालेली बासुंदी आणि सोपी पद्धत पाहून उपस्थित महिलांनी समाधान व्यक्त केले. अशा घरगुती व्यवसायातून आर्थिक उत्पन्न वाढू शकते, हा विश्वास महिलांमध्ये निर्माण झाला. या उपक्रमाला गावातील महिलांनी चांगला प्रतिसाद दिला.
हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, समन्वयक प्रा. एन. एस. ढालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, प्रा. एन. ए. पंडित, प्रा. जी. बी. अडसूळ आणि प्रा. आर. डी. नाईकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
सदर प्रात्यक्षिक यशस्वी करण्यासाठी कृषीदूत आदित्य कणसे, आदित्य साबळे, कुणाल काशिद, ऋतुराज पाटील, रोहित वाबळे, विश्वजीत साळुंखे आणि सोमनाथ ढोपे यांनी विशेष परिश्रम घेतले.

