मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन सोनाराला २० लाखाची खंडणी मागणारा जेरबंद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ जुलै २०२२ । सातारा ।  शहरातील प्रख्यात सोनाराला तुझ्या मुलाला जीवंत सोडणार नाही, जीवे मारणार असल्याची धमकी देऊन २० लाख रुपयांची खंडणी मागणार्‍या राजेंद्र भगवान मोहिते, रा. लक्ष्मीनगर, कोरेगाव याला पोलिसांनी शिताफीने पाठलाग करुन पकडले. कोल्हापूर जिल्ह्यातील व्यक्तीच्या नावे सीमकार्ड ऍक्टिवेट करुन, त्याद्वारे सोनाराला कॉल करुन खंडणी मागण्यात आली होती. पोलिसांनी प्रसंगी वेषांतर केले आणि तांत्रिक माहितीच्या आधारे मोहिते याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या साथीदाराचा शोध सुरु आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की शहरातील लक्ष्मीनगर परिसरात वास्तव्यास असलेला राजेंद्र भगवान मोहिते याने पैशाच्या अडचणींमुळे प्रख्यात सोनाराकडून खंडणी उकळण्याचा कट आपल्या साथीदारांसह रचला. त्याने नव्याने कोल्हापूर जिल्ह्यातील व्यक्तीच्या नावे मोबाईल हँडसेट व सीमकार्ड खरेदी केले. या कार्डवरुन त्याने सोनाराला कॉल करुन तुझ्या मुलाला जीवंत ठेवत नाही, जीवंत रहायचे असेल तर २० लाख रुपयांची खंडणी दे, असे म्हणून तो एका गुंडाचे नाव पुढे करत होता व त्याआधारे सातत्याने खंडणी मागत होता.

यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी पोलीस निरीक्षक नितीन सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना शिंदे व उपनिरीक्षक विशाल कदम यांना तातडीने गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. तातडीने तपास पथक स्थापन करुन चौकशीस सुरुवात करण्यात आली. मोबाईल क्रमांकाच्या आधारे शोध मोहीम सुरु केल्यावर प्रथमदर्शनी कोल्हापूर जिल्ह्यातील व्यक्तीचा सहभाग दिसून आला, मात्र त्यानंतर तो क्रमांक सातारा जिल्ह्यातच वापरात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पुसेगाव, भुईंजसह कोरेगाव परिसरात मोबाईल शॉपींमध्ये शोध मोहीम हाती घेतली. एकीकडे पोलीस संशयिताच्या जवळपास पोहोचत असतानाच, खंडणीखोराने सोनाराला खंडणीचे पैसे घेऊन त्रिपुटी खिंड परिसरात बोलावले.

पोलिसांनी तातडीने वेषांतर केले आणि खावली, त्रिपुटी व भिवडी परिसरात सापळा रचला. पोलिसांनी अचूक टायमिंग देखील साधले होते, मात्र पोलिसांचा संशय आल्याने खंडणीखोराने पुन्हा कॉल करुन धमकी दिली. त्यानंतर त्याने मोबाईल क्रमांक बंद ठेवला.
पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरु केला. त्यानंतर एका बातमीदाराने संशयित कोरेगावातील लक्ष्मीनगर परिसरात स्वत:ची ओळख लपवून राहत असल्याची माहिती दिली. या माहितीची पडताळणी करत असतानाच तो निसटण्याचा प्रयत्नात होता. मात्र, सहाय्यक निरीक्षक अर्चना शिंदे व पथकाने पाठलाग करुन ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र तांत्रिक माहिती सांगताच, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. स्वत:ला आणि साथीदाराला पैशाची अडचण होती, त्यामुळे सोनाराला खंडणी मागितली असल्याची कबुली दिली. त्याला अटक करुन न्यायालयात हजर केले असता, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्याच्या साथीदाराचा शोध सुरु आहे. सहाय्यक निरीक्षक अर्चना शिंदे तपास करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!