
स्थैर्य, फलटण, दि. 24 ऑगस्ट : फलटण तालुक्यातील सांगवी गावचा सुपुत्र, सोहम विजय टेंबरे याने वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी अमेरिकेतील ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेच्या दौऱ्यासाठी निवड होऊन एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या उपक्रमांतर्गत ‘आयुका’मार्फत घेण्यात आलेल्या अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेतून त्याची निवड झाली असून, त्याने फलटण तालुक्याचे नाव सातासमुद्रापार पोहोचवले आहे.
सोहम हा मूळचा फलटण तालुक्यातील सांगवी येथील असून, तो सध्या बारामती तालुक्यातील सांगवी येथील पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या ‘विद्यार्थ्यांना नासा व इस्रो भेटीची संधी’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत झालेल्या निवड परीक्षेत जिल्हाभरातून सुमारे १४ हजार विद्यार्थी बसले होते. त्यामधून अंतिम २५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली, ज्यामध्ये सोहमने आपल्या अभ्यासाच्या आणि मेहनतीच्या जोरावर स्थान मिळवले.
प्रसिद्ध मॅरेथॉनपटू विजय टेंबरे यांचा तो सुपुत्र आहे. त्याला त्याच्या वर्गशिक्षिका सुनीता अर्जुन खलाटे आणि इतर शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या निवडीमुळे त्याला अंतराळ संशोधन क्षेत्राची प्रत्यक्षात माहिती घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
या उत्तुंग यशाबद्दल विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार आणि पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सोहमचे कौतुक करून त्याला शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे, सोहमच्या पुढील शिक्षणाचा संपूर्ण खर्च पुणे जिल्हा परिषद उचलणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले. सातारा जिल्ह्यातून सर्वात कमी वयात ‘नासा’ भेटीचा बहुमान मिळवल्याने सोहमवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.