
स्थैर्य, वाई, दि. १७: ओझर्डे (ता. वाई) येथील जवान सोमनाथ अरविंद तांगडे (वय 38) यांना सिक्कीम येथे कर्तव्य बजावताना वीरमरण आले. तांगडे यांच्या जाण्याने ओझर्डेसह वाई तालुक्यात शोककळा पसरली आहे.
तांगडे हे सिग्नल डिपार्टमेंटमध्ये हवालदार पदावर कार्यरत होते. सिक्कीममधील कॉलिंग पाँग येथून दहा किलोमीटर दूर एका बर्फाच्या टेकडीवर कर्तव्यावर असताना दि. 8 एप्रिल रात्री बर्फाच्या पावसाचा वर्षाव झाला. त्यात त्यांचा तंबू उडून गेला. रात्रभर तांगडे व त्यांचे साथीदार थंडीत कुडकडले. त्यातच तांगडे यांना चक्कर आल्याने तेथेच पडले अन् गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कॉलिंग पाँग येथील बॅरेकपुर येथील मिल्ट्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. तेव्हापासून ते कोमात होते. आज सकाळी सातच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव सिक्कीमवरुन विमानाने पुण्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
तांगडे यांनी अनेक ठिकाणी देशसेवा केली. सेवा संपल्यानंतर दोन वर्ष त्यांनी सेवा वाढवून घेतली होती. त्यांना आलेल्या वीरमरणामुळे तांगडे कुटुंबियासह ओझर्डे गावावर शोककळा पसरली असून त्यांच्या पार्थिवाकडे नजरा लागल्या आहेत. त्यांचे काही नातेवाईक व ग्रामस्थ पार्थिव ताब्यात घेण्यासाठी पुण्याकडे रवाना झाले आहेत. तांगडे यांच्या पश्चात आई, पत्नी व 12 व 8 वयाच्या दोन मुली आहेत.
दोनच महिन्यापूर्वी तांगडे हे गावी आले होते. त्यांचे वडिल आजारी असल्याने त्यांनी उपचारासाठी पुणे येथील मिल्ट्री हॉस्पिटलमध्ये उपचार करुन प्रयत्न केले होते, मात्र, वडिलांचे निधन झाले होते.