एकादशीच्याा घरी शिवरात्र पाहुणी; संभाव्य स्थलांतरितांमुळे होणार स्थानिक प्रशासनाची अवस्था
कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी
पाठमोरी आता गाडी वाट मुंबईची काढी
आली मुंबई या जावू राणीचा तो बाग पाहू
गर्दी झगमग हाटी…कशासाठी पोटासाठी…
आमच्या लहानपणी कवी माधव ज्यूलियन यांचे हे बालगीत प्रसिध्द होते. भारतीय रिझर्व बँक,शेअर मार्केट, कापड गिरण्या,चित्रपट सृष्टी,वेगवेगळे उद्योगधंदे यामुळे मुंबई हे राज्याचेच नव्हेतर देशाचे आकर्षण होते. देशाची राजधानी जरी दिल्ली असली तरी आजतागायत आर्थिक् राजधानीचा मानाचा मुकूट मुंबईचाच आहे. मुंबईत येईल त्याला व्यवसाय,नोकरीच्या निमित्ताने रोजगार मिळतच होता. त्यामुळे कामाधंद्या साठी मुंबईत जाणार्यांचा ओघ दिवसेंदिवस वाढतच राहिला. एवढा की, देशातल्या छोट्या राज्यापेक्षा मोठा अर्थसंकल्प एकट्या मुंबई महानगरपालिकेचा असतो. एवढी मोठी आर्थिक उलाढाल दिवसरात्र होणार्या या महानगरीत प्रत्येकाला काही ना काही काम मिळतच होते. पोटापाण्याची सोय होत होती. सुरुवातीला दाक्षिणात्य व नंतर उत्तर भारतीयांचे लोंढे या महानगरीत वाढले परंतुु सतत दुष्काळाच्या छायेत पिचलेला राज्यातलाही नागरिक येथे ओढला गेला. महापूर,अपघात,बाँबस्फोट,रोगराई अशा यापुर्वी अनेक संकटांना तोंंड देत प्रत्येकजण त्या संकटांना पुरुन उरला. अशा इतक्या संकटांनतर सुध्दा पुन्हा नव्या जिद्दीने उभे राहणार्या या मुंबईकरांच्या प्रचंड आत्मविश्वासाला देशाच्या पंतप्रधानांसहित सर्वांनीच सलाम ठोकला होता. पण अचानक कोरोना आपत्तीने सार्या जगाबरोबरच राज्याला आणि सर्वात जास्त मुंबईला घेरले. सर्वच उद्योगधंदे आणि अर्थचक्र जागच्या जागी थांबले. सगळ्यांचीच जीव वाचविण्याची धडपड. जान हैं तो जहॉन हैं म्हणत जे जे जगण्यासाठी येथे आले होते ते जीव वाचविण्यासाठी येथून जमेल तसे मिळेल त्या मार्गाने आपापल्या घराकडे परतू लागले. सर्वांच्या परतीची घाई,गर्दी पाहून शासनही हतबल झाले. आणि ज्यांना जायचे आहे त्यांना परवानगी द्यावी लागली.
महाराष्ट्रासह मुंबईतही कोरोनाचा थैमान पाहायला मिळत आहे. मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना एक धक्कादायक बातमी समोर आली. जे या आरपारच्या लढाईत आघाडीवर लढत आहेत अशा डॉक्टर्स आणि पोलिसांनाच कोरोनाला सामोरे जावे लागले. त्यामुळे ड्युटीवर असलेल्या वैद्यकीय कर्मचार्यांना क्वॉरंटाइन करून काही हॉस्पिटल बंद केली गेली. हॉस्पिटलमधील ओपीडीसह इतर सर्व वैद्यकीय सेवा बंद करण्यात आल्या आहेत. संसर्ग वाढल्यापासून या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना प्रकृती स्थिरावल्यानंतर घरी पाठवण्यात आले होते. आता हळूहळू सरकारची जबाबदारी संपणार आहे. देशभरात काही लाख लोकांकरता विलगीकरण कक्ष, पीपीई किट, डॉक्टर-नर्स चे प्रशिक्षण, औषधे इ. शक्य तितक्या व्यवस्थांची निर्मिती सरकारने केली आहे. आवश्यक त्या सूचनांचा दोन महिने भडिमार केला आहे. आता या पुढे तो करोना आणि तुम्ही. करोना तर सर्वत्र सोबतीला असणारच आहे. त्याला किती जवळ घ्यायचं कि लांब ठेवायचं हे ज्याने त्याने ठरवावं. करोना झाला तर क्वारंटाईन ला नेऊन टाकणे एवढेच काम प्रशासन करेल. कदाचित सहा आठ महिन्यानी व्हॅक्सिन येईलही. तोपर्यंत गर्दी, गडबड, गोंधळ त्यातच आता पावसाळा तोंडावर आला आहे. चांगल्या पाऊसमानाचे संकेत हवामान खात्याने दिलेले आहेत. पावसाळी वातावरणात कोरोना संक्रमणाचा धोका अधिक वाढणार असल्याचा अंदाज आहे. आधीच बहुसंख्येने मुंबईतून आपल्या जिल्ह्यात स्थलांतर झालेलेच आहे. ते या पुढील काळात वाढेल असा प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकार्यांचा अंदाजच नव्हेतर दावा आहे. शासनाच्या नियमांप्रमाणे त्यांच्या मुळ गावातच त्यांची सोय करावी लागणार आहे. बंधनकारकच असल्याने विरोध करता येणार नाही. त्या स्थलांतरितांचे क्वारंटाईन करणे हिच प्रशासनाची मोठी डोकेदुखी ठरणार असून लॉकडाऊन शिथिल केलेलाच आहे. त्यातच शाळा सुरु होण्याचे सुतोवाच शासनाने केले आहे. दोन महिन्यांपेक्षा जास्त प्रमाणात डांबलेला नागरिक आता बाहेर पडणार असून त्यांना बांधून ठेवणे शासनास शक्य नाही. आता शासनाच्या दिवसेंदिवस परिस्थितीनुसार बदलणार्या नियमांना विरोध किती करायचा, त्यात आपण सहभागी व्हायचे कि नाही हे ज्याचे त्याने ठरवावे लागेल. 135 कोटी लोकांना सरकार फार काळ डांबून ठेऊ शकत नाही. लॉकडाउनसारखे निर्णय आर्थिक दृष्टीने अनर्थकारी ठरू शकतात पण प्रशासनासमोर असलेले पर्याय सुद्धा तितके सोपे नाहीत हे सुद्धा विचारात घ्यावे लागेल. कोविड-19 ची लागण न झालेल्या रुग्णांकडे होणारे दुर्लक्ष आणि लॉकडाउनच्या गंभीर मानसिक परिणामांकडे एका लेखात लक्ष वेधण्यात आले आहे. ‘लॉकडाउन वाढवल्यामुळे फक्त आर्थिक अनर्थच ओढवणार नाही तर त्यामुळे दुसरे गंभीर वैद्यकीय संकट निर्माण होऊ शकते’ यामुळे स्वतःची नि स्वतःच्या कुटुंबाची काळजी तुमची तुम्हीच घ्या. सुरक्षेचे, स्वच्छतेचे नियम पाळा व जीव वाचवा. हे वर्ष व्यक्ती, कुटुंब, व्यवसाय, समाज जिवंत ठेवण्याचे आहे. काही कमी अधीक होईल त्यासाठी भांडत बसून गोंधळ करण्याचे नाही, हेच विचारात घेणे अत्यावश्यक ठरेल.