झिरपवाडी ग्रामीण रूग्णालयाचा प्रश्न मार्गी लावा

सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले यांची मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 4 मार्च 2025। फलटण सध्याच्या मंत्रीमंडळात जिल्ह्यातील चार मंत्री, एक उपमुख्यमंत्री तसेच सर्व आमदार महायुतीचेच आहेत. त्यामुळे गेली तीस वर्षे बंद असणार्‍या झिरपवाडी ग्रामीण रूग्णालयाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले यांनी केली आहे.

ते म्हणाले, झिरवाडी येथील ग्रामीण रूग्णालय सुरू व्हावे म्हणून गेली तीस वर्षापासून संघर्ष सुरू असून यासाठी अनेक वेळा आंदोलने केली. अनेक ठिकाणी निवेदन देऊन पाठपुरावा केला परंतु यश आले नाही. त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या ठिकाणी ग्रामीण रूग्णालय सुरू करण्याची मागणी केली.

सध्या मंत्रीमंडळात जिल्ह्यातील चार मंत्री तसेच जवळपास सर्वच आमदार महायुतीचेच आहेत. या सवार्र्ंनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास ग्रामीण रूग्णालयाचा प्रश्न मार्गी लागेल. झिरपवाडी ग्रामपंंचायत हद्दीत 30 ते 35 वर्षापूर्वी 8 ते 10 एकर जागेत लाखो रूपये खर्चकरून ग्रामीण रूग्णालय उभारण्यात आले. त्या वेळी सुसज्ज इमारत, आवश्यक वैद्यकीय साधने, सुविधा आणि पुरेसा अधिकारी/कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आला असूनही रुग्णालय प्रत्यक्ष सुरु झाले नाही.

त्यामुळे 1997 मध्ये तत्कालीन राज्यपाल डॉ.पी.सी. अलेक्झांडर यांची दशरथ फुले यांनी भेट घेतली. त्यांना सर्व साधने सुविधा, आवश्यक डॉक्टर्स व अन्य अधिकारी कर्मचारी नियुक्त करुनही हे रुग्णालय सुरु करण्यात येत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. राज्यपालांनी संबंधीतांना रुग्णालय सुरु करण्याबाबत सूचना केली. त्यानुसार ग्रामीण रुग्णालय सुरु झाले मात्र ते पूर्ण क्षमतेने न चालल्याने अखेर बंद करण्यात आले.

सध्याच्या काळात करोना सारखे साथीचे रोग उदभवतात अशा वेळी रूग्णाना खाजगी हॉस्पिटलचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे रुग्णांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागतो. जर ग्रामीण रूग्णालय सुरू झाले तर गोरगरीब रूग्णाना मोठा आधार मिळणार आहे.

या रुग्णालयाची इमारत गेली 25/30 वर्षे दुर्लक्षित राहिल्याने इमारतीची दारे, खिडक्या, यंत्र सामुग्री अज्ञात चोरट्यांनी लांबविल्या असून त्यामुळे रुग्णालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या या इमारतीचा गैर मार्गासाठी वापर केला जात आहे. या रूग्णालयाच्या इमारतीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येणार असून जिल्ह्यातील मंत्रीमंडळात असणारे मंत्री, आमदार यांनी लक्ष घालून ग्रामीण रूग्णालय सुरू व्हावे या साठी प्रयत्न करावे अशी मागणी दशरथ फुले यांनी केली आहे


Back to top button
Don`t copy text!