समस्यांवर उपाय, थेट मतदारांशी संवाद! प्रभाग १२ मध्ये भाजपचे अरुण खरात यांचा प्रचार वेगात


स्थैर्य, फलटण, दि. 27 नोव्हेंबर :फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ मधील भाजप उमेदवार अरुण खरात यांनी आपल्या प्रचाराला मोठी गती दिली आहे. मतदारांनी विकासाच्या प्रवाहात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी भाजपाच्या उमेदवारांना संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी नुकत्याच झालेल्या भेटीगाठीतून केले आहे. स्थानिक समस्यांवर ठोस उपाय आणि भविष्यातील विकास आराखडे लोकांसमोर मांडत त्यांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे.

अरुण खरात यांनी घर-दार भेटींच्या माध्यमातून थेट नागरिकांशी संवाद सुरू ठेवला आहे. शहराच्या प्रगतीत आपले योगदान कसे असेल, याची माहिती ते मतदारांपर्यंत पोहोचवत आहेत. निवडून आल्यास पाणीपुरवठा, रस्ते आणि पथदिव्यांची व्यवस्था अशा मूलभूत सुविधांवर अधिक भर देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

प्रचार यंत्रणेतील कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभागातील प्रत्येक भागात पोहोचण्यासाठी नियोजन करून भेटीगाठींचा वेग वाढवण्यात आला आहे. नागरिकांच्या अडचणी, मागण्या आणि अपेक्षा जाणून घेत, त्या भागांमध्ये कोणती कामे प्राधान्याने करायची, याचे ते बारकाईने निरीक्षण करत आहेत.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम प्रशासन असणे आवश्यक आहे, हे ते मतदारांना पटवून देत आहेत. निवडणुकीची लढत जवळ येत असताना, अरुण खरात पुढील काही दिवसांत प्रचार अधिक तीव्र करणार आहेत आणि त्यांच्या या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

 


Back to top button
Don`t copy text!