
दैनिक स्थैर्य | दि. २१ जुलै २०२३ | सातारा |
परळी खोर्यात असलेल्या सांडवली वारसवाडी (ता. सातारा) गावचे सुपुत्र विजय रामचंद्र कोकरे यांना जम्मू-काश्मीर येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले आहे. त्यांना वीरमरण आल्याची बातमी समजताच परळी खोर्यात शोककळा पसरली आहे.
शहीद जवान विजय कोकरे यांचे शिक्षण मुंबईत झाले आहे. शालेय जीवनापासूनच त्यांना सैन्यदलात जाण्याची तीव्र इच्छा होती. २०१७ साली ते सैन्यदलात भरती झाले. त्यांचे आई-वडील मुंबईतच वास्तव्यास आहेत. विजय कोकरे यांचे वडील मुंबईत वाहनचालक म्हणून काम करतात.
शहीद विजय कोकरे यांच्या पश्चात आई-वडील व बहीण असा परिवार आहे. विजय कोकरे हे चार वर्षांपासून सैन्यदलात कार्यरत होते. जम्मू-काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी आर्मी सेंटरकडून त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली.
विजय कोकरे हे शहीद झाल्याची बातमी परळी खोर्यात वार्यासारखी पसरली. त्यानंतर ठिकठिकाणी त्यांच्या श्रद्धांजलीचे फलक ग्रामस्थांकडून लावण्यात आले आहेत.