महिला सक्षमीकरणासाठी शासनाचे पाऊल – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची माहिती
स्थैर्य, अमरावती, दि. 13 : लॉकडाऊनच्या कालावधीतही महिला बचत गटांनी सोलर चरख्याच्या माध्यमातून मास्कर्निमिती केली. कोरोना प्रतिबंध उपाययोजनांत त्याची मदत झाली. त्यामुळे जिल्ह्यात गटांना सोलर चरखे देऊन महिला सक्षमीकरणासाठी पाऊल उचलण्यात येत आहे. मिशन सोलर चरखाअंतर्गत धारणी तालुक्यात एक हजार सोलर चरखे व दोनशे सोलर लूम वाटपाचे नियोजन आहे, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
लघुउद्योग, महिला बचत गटांच्या मार्फत गृहोद्योग व विविध व्यवसायांना चालना याद्वारे शासनाकडून महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न होत आहेत. जिल्ह्यात सोलर चरख्याच्या माध्यमातून कापड निर्मितीला चालना देण्यात आली आहे. जिल्ह्यातील आदिवासी व ग्रामीण क्षेत्रातील बचत गटांच्या समन्वयाने कस्तुरबा सोलर खादी महिला समिती कार्यरत आहे. या समितीच्या उत्पादनांना चांगली मागणी मिळत असल्याने अनेक महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांत महिला बचत गटांनी सोलर चरख्याच्या माध्यमातून मास्कनिर्मितीत योगदान देण्याचे आवाहन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केले होते. त्यानुसार गटांकडून मोठ्या प्रमाणावर मास्कनिर्मिती होऊन महिलांना लॉकडाऊनच्या काळात रोजगारही उपलब्ध झाला. रोज धुऊन पुनर्वापर करता येणारे कापडाचे सुरक्षित मास्कही सर्वत्र उपलब्ध झाले. पहिल्या दोन आठवड्यातच 25 हजारांहून अधिक मास्क या माध्यमातून उपलब्ध झाले होते.
जिल्ह्यात महिला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हाव्यात यासाठी सोलर चरखे युनिट ठिकठिकाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. त्यानुसार केंद्र शासन प्रणित मिशन सोलर चरखाअंतर्गत धारणी तालुक्यात एक हजार सोलर चरखे वाटपाचे नियोजन आहे. त्याचप्रमाणे, दोनशे सोलर लूम वाटप करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिली.
समितीच्या माध्यमातून एमआयडीसी येथे कापड उत्पादनाचे युनिट कार्यान्वित करण्यात आले आहे. त्याच्या उत्पादनांना राज्यभरात मागणी असते, अशी माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे यांनी दिली. ते म्हणाले की, कुटुंबातील लहान मुले, मोठ्या व्यक्ती व महिला यांना डोळ्यासमोर ठेवून समितीने विविध प्रकारच्या वस्त्रनिर्मितीवर भर दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विक्री केंद्रही सुरू करण्यात आले आहे. खादी यार्न व फॅब्रिक यात अत्युच्च दर्जाच्या वस्त्रनिर्मितीचे उद्दिष्ट समितीने डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यासाठी सोलर चरखा युनिटचे विस्तारीकरण करण्याचे नियोजन आहे. त्यातून आदिवासी क्षेत्रातील, तसेच खेडोपाडी राहणाऱ्या महिलांना रोजगारही उपलब्ध होणार आहे.
या संपूर्ण प्रकल्पाचे कार्यान्वयन कस्तुरबा सोलर खादी महिला समिती करीत आहे. समितीच्या अध्यक्ष रुपाली खडसे तर सचिव प्रणिता किडीले या आहेत . तसेच कल्पना शेंडोकर , मंजु ठाकरे, वर्षा चौधरी , वर्षा जाधव ,विमल बिलगये , वैशाली राजुरिया, भाग्यश्री मोहिते आदी सदस्य आहेत, असेही श्री. चेचरे यांनी सांगितले.
आकर्षक राखी उत्पादने
शासनाकडून मिशन बिगेन अगेन अंतर्गत विविध उद्योग व व्यवसायांना परवानगी दिलेली असताना समितीनेही नव्या जोमाने विविध उत्पादनांच्या निर्मितीला आरंभ केला आहे. रक्षाबंधन लक्षात घेऊन आकर्षक राख्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. बेसिक, प्रिमियम व देवराखी अशा विविध स्वरूपात या राख्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. समितीकडून विविध केंद्रावर या राख्या उपलब्ध करून देण्यात येत आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.